जयपूर, 11 ऑगस्ट : लग्नानंतर पत्नीचा सतत हुंड्यापायी छळ (torture for dowry) करणे आणि अखेर तिला घराबाहेर काढून फोनवरून तीन वेळा तलाख (triple talaq) दिल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. माहेरच्यांकडून पैसे आणून देणं बंद केल्यामुळे चिडलेल्या सासरच्या मंडळींनी तिला घराबाहेर काढलं आणि पतीनं दुसरं लग्न करण्याची धमकी देत फोनवरून तलाक दिला.
राजस्थानच्या कुमारी गावात राहणाऱ्या मायराचं 7 ऑगस्ट 2020 रोजी जाकिर हुसैन नावाच्या तरुणासोबत लग्न झालं होतं. त्यानंतर सासरच्या मंडळींकडून मायराला सतत हुंड्याची मागणी केली जायची. मायरा अनेकदा माहेरी जाऊन काही पैसे घेऊन येत असे. मात्र हे पैसे तुटपुंजे असल्याचे टोमणे मारत सासरचे तिला सतत छळत असत. एकदा तर तिने माहेरी जाऊन सरळ 25 हजार रुपये आणले आणि सासरच्यांना दिले. त्यानंतर काही दिवस तिच्यासाठी सुखाचे गेले. मात्र त्यानंतर पुन्हा पती आणि इतर नातेवाईकांनी तिच्याकडे 1 लाख रुपये हुंडा घेऊन येण्याची मागणी केली, अशी बातमी 'दैनिक भास्कर'ने दिली आहे.
मारपीट आणि हकालपट्टी
मायरानं सासरहून पैसे आणायला नकार दिल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी मारहाण करून तिला घराबाहेर काढलं. सासरा कासम, भावजय फिरदौश, सासू हाफिजा, दीर शोएब आणि दोन नणंदांनी तिला मारहाण केली आणि माहेरी निघून जाण्याची तंबी दिली. त्यानंतर माहेरी राहायला आलेल्या मायराला पतीनं फोन केला. मायराच्या अपरोक्ष तिचा पती मुंबईचा निघून गेला होता. मुंबईतून फोन करून त्याने पैसे न दिल्यास दुसरं लग्न करण्याची धमकी दिली. फोनवरूनच आपण तीन तलाक देत असून अधिक पैसे हुंड्यात देणारी पत्नी आपण आणू, असं त्यानं मायराला सांगितलं.
हे वाचा -पुण्यात डॉक्टर पतीनं चाकूनं कापले डॉक्टर पत्नीचे केस, आरोपी अटकेत
पोलिसांत तक्रार
यानंतर मायरानं पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली आहे. भारत सरकारने केलेल्या नव्या कायद्यानुसार तीन तलाक हा गुन्हा आहे. फोनवरून तीन वेळा तलाक देऊन वेगळे होण्याचा प्रयत्न करणं, हा कायदेशीर गुन्हा मानला गेला आहे. पोलिसांनी याबाबत मायराचं म्हणणं ऐकून घेत गुन्हा दाखल केला आहे. हा आरोप सिद्ध झाला तर मायराच्या पतीला तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rajasthan, Triple talak