यवतमाळ, 15 सप्टेंबर : यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील लाख खिंड येथील भटक्या विमुक्त जाती आश्रम शाळेतील एका विद्यार्थ्यावर शाळेजवळच रान डूकराने हल्ला केला. यात 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे विद्यार्थ्याने जीव गमावला. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. माऊली येथील रिंकेश प्रवीण राठोड हा 8 वर्षाचा विद्यार्थी नरसिंग भानावत विमुक्त जाती व भटक्या जमाती आश्रम शाळेत शिक्षण घेत होता. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्याने आई आणि मामाने त्याला या शाळेत शिक्षणासाठी टाकले होते. मात्र आज तो शाळेशेजारी शौचास गेला असता रानडुकराने त्याच्यावर हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. 6 महिन्यापूर्वीच रींकेषच्या वडिलांचं देखील अपघातात मृत्यू झाला होता. या आश्रम शाळेची एकून विद्यार्थीसंख्या 225 आहे. मात्र त्या ठिकाणी पुरेशा सोईसुविधा नाही. वास्तविक पाहता शासनाच्या नियमाप्राणे 10 विद्यार्थ्यांमागे एक शौचालय असणे गरजेचे आहे. पण या ठिकाणी केवळ 6 शौचालय आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शौचालयासाठी बाहेर जाण्याची वेळ येते. त्यामुळे रिंकेशला जीव गमावण्याची वेळ आली. ( बायकोशी रोजचं भांडण, शिवसेना नेत्याचं टोकाचं पाऊल, मित्रांच्या साथीने योजना आखली आणि… ) दरम्यान, लाख खिंड येथील दुर्दैवी घटनेमुळे समाज कल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रम शाळेचा खरा चेहरा बाहेर आलाय. या ठिकाणी पूर्ण वेळ अधीक्षक असतो. मुलावर देखरेख ठेवण्यासाठीच त्यांची नियुक्ती असते. मात्र आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले जाते. आता या घटनेनंतर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी घटनास्थळाला भेट दिली. आणि दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. रिंकेशच्या मृत्यूनंतर त्याचे मामा, आजी आणि आई त्याचे कपडे आणि इतर साहित्य घेण्यासाठी आश्रम शाळेच्या वसतिगृहात आले. त्यावेळी समाज कल्याणचे अधिकारीसुद्धा त्याठिकाणी आले. नातेवाईकांनी अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरुवातीला अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. तेव्हा संतापलेले नातेवाईक अधिकाऱ्यांच्या गाडीकडे गेले आणि जाब विचारला. त्यावेळी मुलाच्या आठवणीने व्याकूळ झालेली रिंकेशची आई ढसाढसा रडत होती. तेव्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी मदतीचं आश्वासन दिलं. अधिकाऱ्यांच्या अक्षम्य चुकीमुळे एका विद्यार्थ्याचा जीव गेला. त्यामुळे दोषींवर नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.