रत्नागिरी, 15 सप्टेंबर : शिवसेना नेत्याने मित्रांच्या मदतीने पत्नीला पेट्रोल टाकून जाळलं आहे, यात तिचा मृत्यू झाला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी शिवसेना नेता सुकांत सावंत याने स्वत: पोलीस स्टेशनला गेला आणि त्याने पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सुकांतला चौकशीसाठी बोलावलं. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्याने आपणच हत्या केल्याचं कबूल केलं. रोजच्या भांडणामुळे वैतागून आपण हत्या केल्याचं त्याने मान्य केलं. पोलिसांनी या हत्येप्रकरणी सुकांत सावंत यांच्यासह तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी ज्या आरोपींना अटक केली आहे त्यात शिवसेना नेते सुकांत सावतं, रुपेश सावंत आणि प्रमोद गवानंग यांचा समावेश आहे. सुकांतने पत्नीला जाळल्यानंतर तिचं पार्थिव समुद्रात फेकून दिलं, यावेळी त्याचे सहकारीही तिकडे उपस्थित होते. पुरावा मिळू नये म्हणूनी आरोपींनी महिलेची हाडं समुद्रात वेगवेगळ्या ठिकाणी टाकली, असं पोलिसांनी सांगितलं आहे. सुकांत सावंतची पत्नी स्वप्नाली सावंत रत्नागिरी पंचायत समितीच्या अध्यक्ष होत्या. सुकांत सावंतही स्थानिक नेता आहे. स्वप्नाली सावंत यांना जाळून आणि हाडं समुद्रात फेकल्यानंतर सुकांत सावंत पोलीस स्टेशनला आला आणि त्याने पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली. पोलीस आरोपीच्या घरीही गेले आणि तिथला तपास केला. शेजाऱ्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना सुकांतवर संशय आला, यानंतर त्यांनी सुकांतला ताब्यात घेतलं. कठोर चौकशी केली असता त्याने पत्नीची हत्या केल्याचं मान्य केलं. पत्नीसोबत रोजच्या भांडणांमुळे नातं खराब झालं होतं, त्यामुळे आपण हे टोकाचं पाऊल उचललं, यात आपल्याला मित्रांनीही मदत केली. या सगळ्यांनी मिळून स्वप्नालीला एका खोलीत बंद केलं आणि पेट्रोल टाकून आग लावली, असं सुकांतने पोलिसांना सांगितलं. सुकांतच्या सांगण्यावरून पोलिसांनी समुद्रात तपास केला, पण अजूनही त्यांना काहीही मिळालेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.