सांगली, 27 ऑगस्ट : पती आणि पत्नीमध्ये भांडण होणे स्वाभाविक आहे. अनेक पती-पत्नीमध्ये भांडण होते आणि ते लवकरच ते भांडण विसरुनही जातात. मात्र, काही वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या भांडणातून ते टोकाचं पाऊलही उचलतात. अशीच एक घटना सांगली जिल्ह्यातून समोर आली आहे. पतीने मोबाईलचे लॉक उघडू दिले नाही म्हणून पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण - सांगली जिल्ह्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. मोबाईलचे लॉक उघडून दिले नाही, म्हणून एका विवाहिते महिलेने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. तिच्या पतीने तिला मोबाईलचे लॉक उघडून द्यावे, असा हट्ट ही महिला आपल्या पतीला करत होती. मात्र, तिच्या पतीने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि अखेर निराश झालेल्या या महिलेने घरातील दुसऱ्या खोलीत जात गळफास घेत आत्महत्या केली. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यात ही घटना घडली. मनिषा भगवान खोत, असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. बायकोला घरातील एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत पाहून नवऱ्यालाही मोठा धक्का बसला. ही घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती इस्लामपूर पोलिसांना देण्यात आली. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे. नेमकं काय घडलं - भगवान खोत हे आपली पत्नी आणि दोन मुलांसह वाळवा तालुक्यातील शिरटे येथे राहत होते. अल्प शेती असल्याने भगवान खोत साखर कारखान्यात नोकरी देखील करायचे. तसेच नोकरी आणि शेती करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते चालवत होते. शुक्रवारी सकाळच्या सुमारास भगवान यांचा मोबाईल पत्नी मनीषा हिने घेतला. यावेळी मोबाईलचा लॉक काढून द्या, असा हट्ट ती भगवान यांच्याकडे धरू लागली. हेही वाचा - पुणे : वेबसीरिज पाहून रचला हत्येचा कट, प्रेमात अडथळा ठरल्याने भरदिवसा तरुणाचा खून मात्र, भगवान यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मोबाईलचा लॉक काढून दिला नाही म्हणून मनिषा निराश झाली आणि चहा नाश्ता झाल्यानंतर काही वेळातच बाजूच्या खोलीमध्ये जाऊन तिने साडीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.