गोरखपूर, 26 फेब्रवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकतर्फी प्रेमातून, अनैतिक संबंधातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सर्रास पाहायला मिळत आहेत. यातून आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरखपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिहेरी हत्याकांडाचा खुलासा केला. पोलिसांनी खून करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. घटनेत वापरलेले धारदार शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. शहर एसपी कृष्ण कुमार विश्नोई यांनी पत्रकार परिषदेत तिहेरी हत्याकांडाचा खुलासा केला. शहर एसपी यांनी सांगितले की, आरोपी महिला नीलम आणि अवधेश गुप्ता यांचे हे दुसरे लग्न होते. अवधेश गुप्ता यांला पहिल्या पत्नीपासून दोन मुले होती. तर या महिलेला 12 वर्षांची मुलगी आहे. कृष्ण कुमार विश्नोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्तेवरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. यासोबतच महिलेचे म्हणणे आहे की, पती अवधेश तिच्या मुलीवर घाणेरडी नजर ठेवत असे. या सर्व कारणावरून महिलेने शनिवारी रात्री उशिरा आधी धारदार शस्त्राने पतीचा खून केला आणि नंतर दुसऱ्या खोलीत झोपलेल्या दोन्ही सावत्र मुलांची हत्या केली. विशेष म्हणजे, रात्री उशिरा पोलिसांना सहाजवान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साहबाजगंज परिसरात तिहेरी हत्याकांडाची माहिती मिळाली होती. त्यावर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला, तेव्हा कौटुंबिक वादातून तिहेरी हत्या झाल्याची बाब समोर आली. सध्या पोलिसांनी खून करणाऱ्या महिलेला अटक करून तिची कारागृहात रवानगी केली आहे. वर्षभरापूर्वी नीलमने अवधेश गुप्तासोबत केले लग्न - शहर एसपी गोरखपूर कृष्ण कुमार विश्नोई यांनी सांगितले की, आरोपी महिला नीलम गुप्ता हिने एक वर्षापूर्वी मृत अवधेशसोबत लग्न केले होते, दोघांचे हे दुसरे लग्न होते. या महिलेला पहिल्या लग्नापासून एक मुलगी होती. पती अवधेश मुलीवर वाईट नजर ठेवायचा. यासोबतच मालमत्तेबाबत अनेकदा वाद होत होते. या सर्व कारणांमुळे महिलेने पती आणि सावत्र मुलांची हत्या केल्याची कबुली चौकशीत दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.