नवी दिल्ली 14 जानेवारी : एअर इंडिया प्रकरणाची सुनावणी जेव्हा न्यायालयात पोहोचली तेव्हा आरोपी शंकर मिश्रा याने आपल्या वक्तव्याने सर्वांनाच चकित केलं. शंकर मिश्रा याने महिलेच्या अंगावर लघवी केल्याचं वास्तव न्यायालयात मान्य करण्यास मिश्राच्या वकिलाने नकार दिला. शंकर मिश्राच्या वकिलाने दावा केला की, वृद्ध महिलेनं स्वतःच लघवी केली होती. शंकर मिश्राच्या वकिलाने यावर अजब युक्तिवाद केला. अनेक कथ्थक नर्तकांप्रमाणेच ती महिला प्रोस्टेटशी संबंधित आजाराने ग्रस्त असल्याचा दावा वकिलाने केला. महिलेनं स्वतःच लघवी केली असल्याचं वकिलांनी म्हटलं.
वकिलाने न्यायालयाला सांगितलं की, वृद्ध महिला 30 वर्षांपासून डान्स करत आहे आणि डान्सर्सला लघवीची समस्या असणं सामान्य आहे. मात्र आपल्या घृणास्पद कृत्याबद्दल पश्चात्ताप करण्याऐवजी आरोपी पीडितेला आणखी त्रास देण्याच्या उद्देशाने चुकीची माहिती देत खोट बोलत असल्याचं महिलेच्या वकिलाने म्हटलं आहे.
दुसरीकडे, एअर इंडियाकडून असा दावा करण्यात आला की, तिसऱ्या प्रवाशाने वृद्ध महिलेला भडकवण्याचं काम केलं, त्यामुळे हा मुद्दा इतका मोठा झाला. शंकर मिश्रा यांच्या वकिलाचे नवे दावे, महिलेकडून ते मान्य करण्यात नकार आणि एअर इंडियाच्या नव्या वक्तव्यानंतर आता हे प्रकरण चांगलंच गुंतागुंतीचं झालं आहे.
शुक्रवारी पटियाला कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान आरोपी शंकर मिश्रा याच्या वकिलाने सांगितलं की, माझ्या अशिलाला चेन उघडताना किंवा महिलेवर लघवी करताना पाहिले असे सांगणारा एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. माझ्या क्लायंटचा दोष एवढाच आहे की जेव्हा महिलेनं असा आरोप केला तेव्हा त्यांना लगेच काही समजलं नाही. वकिलांनी शंकर मिश्रा याची बाजू घेत सांगितलं की, आमच्याकडे मोठे लोक जेव्हा काही बोलतात, तेव्हा लहान व्यक्ती त्यांच्यासमोर काहीच बोलत नाहीत.
वकिलाने सांगितलं की, त्यांचा क्लायंट आरोपी नाही. दुसरं कोणीतरी हे असावं. बहुतेक महिलेने स्वतःच लघवी केली असावी. ती प्रोस्टेटशी संबंधित आजाराने त्रस्त होती, ज्याचा त्रास अनेक कथ्थक नर्तकांना होतो. बसण्याची व्यवस्था अशी होती की कोणीही तिच्या जागेपर्यंत पोहोचू शकत नव्हतं. वकिलाने पुढे सांगितलं की, महिलेच्या सीटपर्यंत फक्त मागच्या बाजूने प्रवेश करता येऊ शकत होता आणि तरीही लघवी सीटच्या पुढच्या भागात पोहोचू शकत नव्हती. याशिवाय तक्रारदार महिलेच्या मागे बसलेल्या प्रवाशाने अशी कोणतीही तक्रार केलेली नाही.
शंकर मिश्रा याच्या आरोपांवर पीडित महिलेने आश्चर्य व्यक्त केले आहे. हे आरोप पूर्णपणे खोटे आणि बनावट असून या आरोपांचे स्वरूप निंदनीय असल्याचे महिलेने आपल्या वकिलामार्फत म्हटले आहे. वरील आरोपही पूर्णपणे विरोधाभासी असल्याचे महिलेने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Air india, Shocking news