मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार, अज्ञात व्यक्तीनं कुत्र्याच्या पिल्लांना जाळून मारलं

माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार, अज्ञात व्यक्तीनं कुत्र्याच्या पिल्लांना जाळून मारलं

File Photo

File Photo

माणुसकीला लाजवेल, अशी घटना समोर आलीय.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Bhopal, India

भोपाळ, 5 डिसेंबर : बहुतेक लोकांना कुत्रा आणि मांजर पाळायला आवडतात. त्यातही कुत्रा पाळणाऱ्यांची संख्या जरा जास्तच आहे. अनेकजण घरामध्ये कुत्रा पाळला नसेल, तर रस्त्यावर दिसणाऱ्या भटक्या कुत्र्यांना खाण्यासाठी अन्न देत असतात. मात्र, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका अज्ञात व्यक्तीनं एका कुत्र्याला विष देऊन मारून टाकलं असून त्याच्या तीन पिल्लांना जाळून मारले आहे. या घटनेनंतर प्राणीप्रेमींमध्ये संताप असून त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‘आजतक’ने याबाबत वृत्त दिलंय.

भोपाळमधील चिनार पार्कमध्ये माणुसकीला लाजवेल, अशी घटना समोर आलीय. येथे एका अज्ञात व्यक्तीनं एक कुत्रा आणि त्याच्या तीन पिल्लांना निर्दयपणे मारून टाकले. त्यानं कुत्र्याला विष देऊन तर त्याच्या पिल्लांना जाळून मारले. या घटनेबाबत अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या असून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

चिनार पार्कमध्ये काही दिवसांपूर्वी एका मादी कुत्र्यानं तीन पिल्लांना जन्म दिला होता. काल, रविवारी (4 डिसेंबर 2022) रोजी सकाळी जेव्हा लोक उद्यानात फिरण्यासाठी आले, तेव्हा त्यांना या कुत्र्याची पिल्ले जळालेल्या अवस्थेत दिसली. तर, कुत्र्याचा मृतदेहही त्यांच्यापासून काही अंतरावर पडला होता. त्यानंतर काहींनी प्राणीप्रेमींना ही माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच प्राणीप्रेमी घटनास्थळी पोहोचले. यावेळी कुत्र्याचा, व त्याच्या पिल्लांचे मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला. पिल्लं तर इतकी जळाली होती की, त्यांच्या शरीरातील हाडं दिसत होती. तर, मादी कुत्र्याचं शरीर निळं पडलं होतं. त्यावरून या कुत्र्याला विष देऊन मारण्यात आल्याचं प्राणीप्रेमींचे म्हणणं आहे.

हेही वाचा - वेबसीरिजमध्ये काम देण्याच्या बहाण्याने मॉडेलसोबत संतापजनक कृत्य

अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल - 

प्राणीप्रेमींनी तात्काळ एमपी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 429 आणि प्राणी क्रूरता कायदा कलम 13 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासही सुरुवात केली आहे. याबाबत एमपी नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सुधीर अर्जरिया यांनी सांगितलं की, ‘अशी पहिलीच घटना समोर आली आहे.’

दरम्यान, या धक्कादायक प्रकाराची भोपाळमध्ये चर्चा असून, कुत्र्यांना अशा पद्धतीनं मारून टाकणाऱ्या व्यक्तीबाबत अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. संबंधित व्यक्तीला पकडून त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही प्राणीप्रेमी करीत आहे.

First published:

Tags: Bhopal News, Crime news, Death, Dog