नंदुरबार, 18 एप्रिल : महाराष्ट्राची (Maharashtra) पुरोगामी अशी ख्याती आहे. महिलेला आपण देवी मानतो. पुढे जाणाऱ्या महिलांचं कौतुक करतो. तसेच महिलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतो. पण हे दृश्य गोऱ्या-गोमट्या मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्येच बघायला मिळणार आहे का? कारण हे पुरोगामीत्व राज्याच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेलंच नाही, अशी वास्तविकता आहे. त्याचा पुरावा म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक किळसवाणा आणि संतापजनक व्हिडीओ. या व्हिडीओत एका महिलेला डाकीण असल्याच्या संशयावरुन तिचा प्रचंड छळ केला जातोय. तिला विवस्त्र करुन चटके दिले जात आहेत. इतकं भयानक ते दृश्य आहे. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने आरोपींना शोधून काढून योग्य कारवाई करण्यात यावी. महिलेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. संबंधित घटनेप्रकरणी नंदुरबार पोलीसांनी धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या घटनेबाबत पोलीस अधिक्षकांना निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. यानंतर सबंधित घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधीत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. धडगाव आणि मोलगी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील पोलीस पाटील आणि खबऱ्यांना सदर व्हिडीओ बाबत माहीती देवून तपास करण्याचे देखील कळवण्यात आले आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या या महिलेवरील अत्याचाऱ्याच्या या व्हिडीओमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. नंदुरबारच्या सातपुजा पर्वत रांगांच्या भागात आजही डाकीण सारख्या अंधश्रद्धेवर आधारीत कुप्रथेमुळे महिलांचा कसा अमानुष पद्धतीने छळ केला जातो याला वाचा फोडणारा हा व्हिडीओ सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेप्रकरणी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. ( केंद्र सरकारकडून राज ठाकरेंना विशेष सुरक्षा पुरवली जाणार? ) संबंधित घटनेप्रकरणी नंदुरबारचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संबंधित घटनेप्रकरणी आम्हाला निवेदन प्राप्त झालं आहे. तसेच घटनेची क्लिदेखील प्राप्त झाली आहे. व्हिडीओतील भाषा पाहता ही सातपुडा पर्वतरांगांमधील भाषा दिसत आहे. त्या भाषेच्या आधारावर आम्ही धडगाव भागात तपासही केला. तसेच धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्या आहेत. माझी सर्व समाजघटकांना विनंती आहे. व्हिडीओतील बघिणीसोबत अत्यंत वाईट घटना घडली आहे. पीडित महिला आपली बघिणी आहे. त्यामुळे व्हिडीओक्लीप व्हायरल करु नका. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. आमचा तपास सुरु आहे. तसेच सर्व सामाजिक संघटनांना विनंती आहे की, या प्रकरणाविषयी अधिकची माहिती असल्यास आम्हाला द्यावी. आम्ही योग्य शहानिशा करुन आरोपींना ताब्यात घेऊ. आरोपींवर योग्य कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.