प्रमोद पाटील, प्रतिनिधी पनवेल, 1 एप्रिल : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ आहे. त्यातच आता पनवेल शिवकर गावात एक आश्चर्यकारक आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना 29 मार्चला रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेचा खुलासा आज झाला आहे. काय आहे घटना - 29 तारखेला रात्री दोन वाजताच्या सुमारास तीन जण आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी विकत घेता येत नाही म्हणून कोंबडी चोरण्यासाठी शिवकर गावात शिरले. रात्रीचे दोन वाजता हे तिघेजण गावाकडील बाहेर जाळ्यात ठेवल्या जाणाऱ्या कोंबड्यांच्या शोधात गावात राहणाऱ्या 19 वर्षीय विनय पाटील या तरुणाच्या घराजवळ गेले. मात्र, घराच्या दरवाजाची कडी लावली नसल्याने चोरांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आत डोकावून बघितल्यावर त्यांची घरातल्या काही वस्तूंवर नजर पडली. त्या वस्तू त्यांनी चोरण्याचा प्रयत्न केला असता त्याच ठिकाणी झोपलेल्या 19 वर्षीय विनयला जाग आली. त्यावेळी चोरांच्या लक्षात येताच त्यांनी पळ काढला. मात्र, विनयने उठून घरात घुसलेल्या चोरांच्या मागे जवळ असलेली कुऱ्हाड घेऊन त्या तिघांचाही पाठलाग केला. शेवटी गावाच्या बाहेर काही अंतरावर जाताच त्या तिघांसोबत त्याची झटापट झाली. अशात त्यांनी विनयवर त्याच कुऱ्हाडीने वार केले. यात विनय गंभीर जखमी होऊन खाली पडला. यानंतर चोरांनी तिथूनही पळ काढला. यानंतर काही वेळाने घरातील इतरांना गाढ झोपेतून जाग आल्यावर त्यांनी विनय याला शोधण्याचा प्रयत्न केला. दारुड्या बापाने शिवीगाळ केली, 22 वर्षीय तरुणीला राग झाला अनावर, घेतला भयानक निर्णय पोलिसांनी घेतले तिघांना ताब्यात - यावेळी त्यांना गंभीर जखमी अवस्थेत असलेला विनय सापडला. त्यानंतर त्यांनी त्याला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी विनयला मृत घोषित केले. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला. सर्व बाजूने तपास करताना पोलिसांनी तेथीलच एका बेकरीत काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता याच तिघांनी विनयला मारले असल्याचे निष्पन्न झाले. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी अटक केलेले आरोपी
यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर केले आहे. पोलीस त्यांची पोलीस कस्टडी मागून आणखी काही तपासात निष्पन्न होते का, याचा शोध घेत आहे. मात्र, एका कोंबडीच्या चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांकडून एका तरुणाचा नाहक जीव गेल्याने खळबळ उडाली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.