हरिकांत शर्मा, प्रतिनिधी आग्रा, 7 जून : असं म्हणतात की, अनोळखी व्यक्तीला घरात येऊ देऊ नये. परंतु दारात पोलिसांना बघून भल्याभल्यांना घाम फुटतो, मग ते खरे आहेत की बनावट याची तपासणी करायची राहूनच जाते. परंतु उत्तर प्रदेशातून एक अशी संतापजनक घटना समोर आली आहे की तुम्ही अगदी आयकर विभागातल्या अधिकाऱ्यांनाही त्यांची ओळख न पटवता दारात उभं करणार नाही. आग्र्याच्या सैया पोलीस ठाणा क्षेत्रातून पोलिसांनी 7 भामट्यांना ताब्यात घेतलं आहे. जे खोटे आयकर अधिकारी बनून लोकांच्या घरांवर, दुकानांवर धाडी टाकायचे. आयकर अधिकारी बनून हे भामटे लोकांच्या घरांमध्ये, दुकानांमध्ये घुसायचे. त्यांना घाबरवायचे. लोकांनी आमच्या घरावर धाड टाकू नका, असं म्हणताच त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळायचे. हे सर्वजण दिल्लीचे रहिवासी असून पोलिसांनी त्यांच्याकडून लॅपटॉप, 8 मोबाईल, खोटे आयडी, आधार कार्ड, डेबिट कार्ड जप्त केले आहेत. 2013 साली अभिनेता अक्षय कुमार याचा एक चित्रपट आला होता. ज्याचं नाव होतं, स्पेशल 26. यामध्ये अक्षय कुमार खोटा आयकर अधिकारी बनून घरांवर, दुकानांवर धाडी टाकतो, असं दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट या चोरांनी सत्यात उतरवला. अगदी तसाच व्यवस्थित प्लान करून त्यांनी लोकांना फसवलं. लोकांना त्यांच्यावर संशयही यायचा नाही. परंतु खरं किती काळ लपून राहणार. अखेर याचा थांगपत्ता पोलिसांना लागला आणि त्यांचं भांडं उघडं पडलं. पोलिसांना काही खोटे आयकर अधिकारी सामान्य लोकांना भीती दाखवून पैसे उकळतात याबाबत कळल्यानंतर त्यांनी चोरांना पकडण्यासाठी जाळं टाकलं. पोलिसांच्या जाळ्यात चोर व्यवस्थित अडकले आणि सैया तेहरा फ्लायओव्हरजवळ पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.