हैदराबाद 24 मार्च : पोलिसांना (Police) अगदी सगळेच घाबरतात, कारण त्यांचा पोशाख, त्यांची कामगिरी याची आदारयुक्त भीती सर्वांच्या मनात असते. मात्र, आता पोलिसांचं हे काम त्यांच्या स्निफर कुत्र्यांनी (Sniffer Dogs) केलं असल्याचं समोर आलं आहे. अर्थात पोलिसांचे हे सच्चे दोस्त बॉम्ब हल्ल्यांची शक्यता असते तिथेही स्वत: पुढे होऊन बॉम्ब शोधून काढतात. हे का सांगतोय याचा अर्थ कळेलच. मला सांगा कुठल्याही चोराने स्वत:हून चोरलेल्या रकमेचा काही भाग त्या मालकाला घरपोच परत केल्याचं (Thief Returns Money) तुम्ही कधी ऐकलंय का? नसेलच. पण असं घडलंय तेलंगणातल्या एका गावात.
पोलिसांच्या स्निफर डॉगच्या भीतीने चोराने दोन टप्प्यात मालकाचे 1 लाख 70 हजार रुपये घराच्या दारात बॅग ठेवून परत केले आहेत. स्निफर डॉग वास घेत आपला माग काढतील याची दहशत मनात बसल्याने चोराने पैसे परत केले पण आपण पकडले जाणार नाही याची मात्र या चलाख चोराने काळजी घेतली.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात दुब्बाथांदा या गावातील एका शेतकऱ्याच्या घरातून 1 लाख 70 हजार रुपये चोरीला गेले होते. गुगुलोठ लछ्छाराम असं या शेतकऱ्याचं नाव. त्यांनी 17 मार्चला पोलिसांत जाऊन घरातून 1.70 लाख रुपये चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली. लछ्छारामने रीतसर तक्रार नोंदवल्यानंतर 21 मार्चला पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांनी स्निफर डॉगचं पथक लछ्छारामच्या घरी आणलं. कुत्रं वास घेऊन चोराचा माग काढेल असं पोलिसांना वाटलं. ही घटना त्या चोराने पाहिली आणि त्याच्या मनात दहशत बसली की ही कुत्री सहज माग काढत आपल्यापर्यंत पोहोचतील.
21 मार्चच्या सकाळी लछ्छारामला आश्चर्याचा धक्काच बसला, सकाळी त्याच्या घराच्या दारात एका बॅगेत रोख एक लाख रुपये त्याला सापडले. एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशी 22 मार्चला त्याला 70 हजार रुपयेही तशाच पद्धतीने परत मिळाले. स्निफर डॉगच्या भीतीने पोलिसांनी लछ्छारामचे हरवलेले पैसे पुन्हा मिळवून दिले असले तरीही ते तपास करत असून चोराला पकडणार असल्याचं केरापल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Hyderabad, India, Money, Police, Robbery, Telangana, Theft, Theif