ठाणे, 18 ऑक्टोबर : क्रिप्टो करन्सीच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या थायलंड येथील आंतरराष्ट्रीय टोळीने ठाण्यातील एका तरुणाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकरी देण्याचे बहाने आशिषला थायलंडमध्ये बोलावलं होतं आणि त्यानंतर ओलीस ठेवले आहे. आता हा तरुण आपली सुटका करून घेण्यासाठी दयावाया करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यामधल्या वागळे इस्टेट येथे राहणारा उच्चशिक्षित तरुण आशिष दुबे याच्यासोबत हा प्रकार घडला आहे. 20 सप्टेंबरला आशिष दुबे थायलंड इथं कामानिमित्त गेला होता. त्याच्या एका ओळखीच्या मित्राने थायलंडमध्ये डिजिटल मार्केटिंग या फिल्डमध्ये काम असून चांगल्या पगाराची नोकरी आहे, असं सांगितलं होतं. त्यानुसार आशिषने सर्व प्रक्रिया पूर्ण करून थायलंडमध्ये त्या कंपनीत नोकरी मिळवली.
पण तिथे गेल्यानंतर आशिषला जंगलातून, नदी ओलांडून एका अज्ञातस्थळी नेलं. तिथे गेल्यावर चिनी तरुणांनी आधीच 13 तरुणांना आणून ठेवले होते. सुरुवातीला क्रिप्टोकरन्सी क्षेत्रात ट्रेनिंग दिल्यानंतर बनावट ई-मेल आयडी तेही मुलींच्या नावे तयार केली होती आणि अमेरिकेच्या लोकांना क्रिप्टोकरन्सी विकण्याच्या बहाने त्यांचे बँक खात्यांची माहिती घेऊन त्यांची फसवणूक करण्याचे काम आशिष दुबेला देण्यात आले. पण आशिषने हे काम करायला नकार दिला. त्यामुळे त्याला धमकवले गेले. पण त्याने तात्काळ तिथे राजीनामा दिला. पण जोपर्यंत 1 लाख रुपये आणि 3 हजार डॉलर तो भरत नाही तोपर्यंत त्याला कंपनी सोडणार नाही, अशी धमकी आशिषला दिली. (कारसाठी 21 वर्षीय तरुणाने कुटुंब टाकलं धोक्यात; आता खातोय तुरुंगाची हवा) महिन्याभरापासून तो या टोळीच्या ताब्यात आहे. त्याला जेवण सुद्धा दिले जात नाही. अठरा-अठरा तास आशिष आणि इतर तरुणांकडून काम करून घेतले जात आहे. चायनीज लोकांच्या सुरक्षिततेमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. दिवसांतून फक्त वीस मिनिटे त्यांना शौचालय जाण्यास किंवा इतर विधी करण्यास दिले जातात. बाकी सर्व वेळ त्यांना काम करण्यास भाग पाडले जाते. या सर्व प्रकारानंतर आशिषने ईमेलद्वारे महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, थायलंड दूतावास तसंच भारतीय दूतावास यांना संपर्क केला आहे. पण त्याला अजूनपर्यंत कोणीच प्रतिक्रिया दिलेली नाही, अशी माहिती आशिषचा भाऊ अविनाश दुबे याने दिली. याबद्दल ठाणे येथील श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. श्रीनगर पोलीस देखील थायलंड दूतावास यांच्याशी संपर्क करत आहेत. पण कोणालाही यात यश आलेला नाही. न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधीशी आशिषने साधला संवाद आशिष आणि त्याच्या दोन-तीन मित्रांनी चोरून एक फोन जवळ ठेवला असून त्या फोनद्वारे ते सर्व माहिती त्यांच्या परिवारात देत असतात. जेव्हा आम्ही आशिषशी संपर्क केला त्यावेळेस आशिष अत्यंत घाबरलेला अवस्थेत होता. एवढंच नाही तर भारतातील काही लोकांचा थायलंडच्या या रॅकेटमध्ये समावेश आहे, असे देखील आशिषने फोनवरून माहिती दिली. (चोरट्यांनी ग्राहकाचाच केला ‘पोपट’, पुण्यातील तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार ) तो कशा अवस्थेत राहतोय हे देखील त्याने आम्हाला फोनवरून माहिती दिली. एवढंच नाही, तर आपण इथून परत येऊ की, नाही याची त्याला शाश्वती नाहीये कारण त्याच्यासोबत असलेल्या एका मुलाच्या घरच्यांनी जवळपास पाच लाख रुपये या थायलंड टोळीला दिले पण तरीदेखील त्याला सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे जोपर्यंत राज्य आणि केंद्र सरकार या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहत नाही तोपर्यंत आशिष आणि त्याच्यासोबत असलेल्या तरुणांची सुखरूप सुटका होऊ शकत नाही. या सर्व रॅकेटमध्ये चायना येथील टोळीचा मोठा हात असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे सरकारने यात लक्ष घालून या तरुणांची सुटका करावी अशी मागणी आशिष दुबेच्या परिवारांनी केली आहे.