पुणे, 17 ऑक्टोबर : पुण्यात एका पोपटप्रेमीची लाखोंची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोपटाची आवड असल्याने एकाने दोन पोपटांची दोन लाख रुपयांना ऑनलाइन खरेदी केली. त्यातील अॅडव्हान्स स्वरूपात त्याने एक लाख दिलेही. मात्र, त्याला आजतागायत पोपटच न मिळाल्याने त्याने वानवडी पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे सायबर चोरट्यांनी ग्राहकाचा ‘पोपट’ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अक्षय दिलीप देशमुख (28, रा. सत्यविहार सोसायटीच्या पाठीमागे, वानवडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोबाइलधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे पक्षीप्रेमी असून, ते ऑनलाइन पोपट पाहत असताना त्यांना एका संकेतस्थळावर मकाऊ जातीचे पोपट विक्री होत असल्याचे समजले. त्यांनी लागलीच तेथे उपलब्ध असलेल्या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधला असता मोबाईलधारक व्यक्तीने त्यांना पोपटांचे फोटो पाठविले. ते पोपट फिर्यादी यांना खूप आवडले.
चोरट्यांचा नवा फंडा; Instagram वर आली एक लिंक अन् पुण्यात उच्चशिक्षित तरुणीला लाखोंचा गंडात्या दोन पोपटांची किंमत दोन लाख रुपये ठरली. त्यांनी अॅडव्हान्स स्वरूपात सुरुवातीला ऑनलाइन माध्यमातून एक लाख रुपये पाठविले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हा प्रकार घडल्यानंतरही वारंवार फोन करून आज पोपट मिळतील, उद्या मिळतील, असे म्हणत मोबाईलधारक व्यक्तीने टाळाटाळ केली. अखेर कोणत्याही प्रकारे पोपट न मिळाल्याने ग्राहकाने याबाबत वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्ह्याचा तपास गुन्हे निरीक्षक शिवले करीत आहेत. सध्या ऑनलाइन फ्रॉडच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. ऑनलाइन वस्तू खरेदी करताना त्याची खातरजमा करून घ्यावी. गेल्या काही दिवसात सायबर क्राइमच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.