मदुराई, 18 डिसेंबर: भ्रष्टाचाराच्या प्रकरणात (Graft Case) शिक्षा झालेल्या पोलीस अधिकाऱ्यानं पत्नीची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडू (Tamil Nadu) मधल्या मदुराईमध्ये घडली आहे. पेरुमल पंडियान (Perumal Pandiyan) असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे, त्यांना विशेष कोर्टानं सोमवारीच भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
पंडियान यांनी सुरुवातीला त्यांची पत्नी उमा यांच्या डोक्यात हातोडा मारुन त्यांची हत्या केली. त्यानंतर गळफास घेत आत्महत्या केली. सेलूर भागातील त्यांच्या राहत्या घरात हा सर्व प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उमा या महापालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत.
पंडियान यांचा मुलगा सुंदर कॉम्पुटर क्लासमधून घरी परतल्यानंतर त्यानं सुरुवातीला घराचं दार वाजवलं, त्याला घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सुंदरनं शेजाऱ्यांच्या मदतीनं घराचं दार तोडलं त्यानंतर हा प्रकार समजला. या प्रकरणाची माहिती मिळताच सेलूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व पुरावे गोळा केले आहेत. पांडियान यांनी पत्नीची हत्या करण्यापूर्वी त्यांच्यामध्ये भांडण झांलं होतं, अशी माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.
हे वाचा-हुंड्याने घेतला असहाय्य बापाचा जीव; नवरदेवाच्या एका निर्णयामुळे कुटुंब उद्ध्वस्त
तीन वर्षांची झाली होती शिक्षा
थेनी जिल्ह्यातील असलेले पांडियान हे मदुराईत स्थायिक झाले होते. डॉ. अशोक कुमार यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा तपास करण्याची केस 2010 साली त्यांना सोपवण्यात आली होती. या तपासाच्या दरम्यान त्यांनी 1 लाख 20 हजारांची लाच मागितली, अशी तक्रार डॉ. कुमार यांनी केली होती. कुमार यांच्या तक्रारीनंतर पांडियान यांना सापळा रचून रंगेहाथ अटक करण्यात आली होती.