उज्जैन, 27 मे : उज्जैन जिल्ह्यातील (Madhya Pradesh News) बडनगर पोलीस ठाणे हद्दीत महिला आणि तिच्या मुलाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. प्रेयसीसोबत फोनवर बातचीत करण्यावरुन पतीचं पत्नीसोबत भांडण झालं होतं. यातून पतीने गळा दाबून पत्नी आणि मुलाची हत्या केली होती. यानंतर पोलिसांचं लक्ष भरकटवण्यासाठी तो हातात रशी बांधून जंगलात बेशुद्ध असल्याचं नाटक करू लागला. आरोपी पतीने रचलं कारस्थान… उज्जैनचे एसपी सत्येंद्र कुमार शुक्ला यांनी सांगितलं की, 48 तासांपूर्वी बडनगर भागात एक महिला आणि तिच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. यादरम्यान घटनास्थळावरुन काही अंतरावर महिलेचा पती पोलिसांना सापडला. त्यावेळी पतीचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेत होते. पतीने पोलिसांना सांगितलं की, काही अज्ञातांनी त्याच्या घरावर हल्ला केला होता. आरोपींनी महिला आणि तिच्या मुलाची हत्या केली. यानंतर अज्ञाताने पतीचे हात-पाय बांधले आणि फरार झाले. पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्याने तपास केला. महिलेचा पती वारंवार त्याचा जबाब बदलत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. यानंतर पोलिसी खाक्या दाखवित पतीची चौकशी केली. यानंतर त्याने खरं कारण सांगितलं. प्रेयसीसोबत बातचीत करण्यावरुन त्याचं पत्नीसोबत भांडण झालं होतं. यानंतर रागाच्या भरात त्याने पत्नी आणि मुलाची गळा दाबून हत्या केली. आधी त्याने पत्नीची हत्या केली. हे पाहून मुलगा जोरजोरात रडू लागला. आजूबाजूच्यांना कळेल या भीतीने त्याने मुलालाही मारून टाकलं. मोबाइलमधून पोल खोल.. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर तो रात्री 1.30 वाजता प्रेयसीसोबत बोलत असल्याचं दिसलं. यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. चौकशीनंतर आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.