पुणे, 10 फेब्रुवारी : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुण्यात आर्थिक गुन्हेगारीची वाढल्याचे दिसत आहे. यातच आणखी एक धक्कादायक घटना पुण्यातून उघडकीस आली होती. सावत्र मुलाने आईच्या बँक खात्यावर तब्बल कोट्यावधींचा डल्ला मारल्याचे समोर आले. यानंतर न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण - पुण्यातील औंध परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील सावत्र मुलाने आईच्या बँक खात्यातील तब्बल 11 कोटी 40 लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. सावत्र आईच्या बँक खात्यावर मुलाच्या वडीलांनीच 11 कोटी 40 लाख 28 हजार रुपये ठेवले होते. तर वडिलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सावत्र मुलाने आईच्या परस्पर ही रक्कम लंपास केली आहे. 9 ते 12 ऑक्टोबर 2020 दरम्यान ही घटना घडली. यानंतर आता याप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. घटनेनंतर तब्बल दोन वर्षांनी मुकुंद अशोक कैरे (वय 51) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात आरती अशोक कैरे (वय 70) यांनी सावत्र मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी मुकुंद कैरे हा तक्रारदार यांचा सावत्र मुलगा आहे. त्यांचे पती अशोक कैरे हे हयातीत असताना त्यांनी पत्नीच्या भविष्याकरिता म्युच्युअल फंडात एकूण रक्कम 11 कोटी 40 लाख 28 हजार रुपये गुंतवली होती. मात्र, पतीचा मृत्यू झाल्यावर मुलाने वेगवेगळे मार्ग वापरत ती रक्कम काढून घेतली. हेही वाचा - चुलत भावांमधील वाद विकोपाला, रत्नागिरीमध्ये एकासोबत घडलं भयानक तसेच त्याकरिता सावत्र मुलाने ऑगस्ट 2020 मध्ये अशोक कैरे यांचे नावाचा बनावट ईमेल आयडी तयार केला. इतकेच नव्हे तर त्याद्वारे आरोपीने संबंधित म्युच्युअल फंड खात्यातील अशोक कैरे यांचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक बदलला आणि त्यात स्वत:चा मोबाईल क्रमांक टाकला. तसेच तो मोबाईल क्रमांक अशोक कैरे यांचाच असल्याचे त्याने भासवून रजिस्टर्ड केला. त्यानंतर त्याने बनावट ईमेल आयडी व बदललेला रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकाचा गैरवापर केला आणि म्युच्युअल फंड खात्यातील सर्व रकमा कोणत्याही प्रकारचा अधिकार नसताना स्वत:च्या बँक खात्यात जमा करुन घेतल्या. आता याप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. तसेच याप्रकरणी पुढील तपास सहकारनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस झरेकर करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.