रत्नागिरी, 8 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. खून, बलात्कार, अनैतिक संबंधातून हत्येचीही घटना उघडकीस येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कौटुंबिक वादातून चुलत भावाचा खून झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण बातमी - याबाबतची फिर्याद अनंत राजाराम मोहिते (वय-45, रा. नांदगाव-भुवडवाडी) यांनी दिली आहे. पूर्व वैमनस्यातून उफाळलेला वाद विकोपाला गेला आणि एका तरुणाने आपल्याच चुलत भावाचा डोक्यात लाकडी दांडक्याने मारून त्याचा खून केला. ही घटना रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील नांदगाव-भुवडवाडी येथे सोमवारी घडली. सुरेश केशव भुवड (वय-45, रा. नांदगाव-भुवडवाडी) असे मृताचे नाव आहे. तर महेंद्र महादेव भुवड (वय-44, रा. नांदगाव-भुवडवाडी) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. महेंद्र आणि सुरेश हे नात्याने चुलत भाऊ आहेत. या दोन्ही कुटुंबांमध्ये पूर्वीपासून वाद आहेत. सुरेश हा महेंद्रच्या आई-वडिलांना शिवीगाळ करीत असे. काही महिन्यांपूर्वी त्याने महेंद्रच्या वडिलांना मारहाणही केली होती. त्यांच्यातील वाद अनेकदा सावर्डे पोलिसातही गेला आहे. दरम्यान, सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. हेही वाचा - भरदिवसा कुऱ्हाडीचा वार, बायकोला संपवून नवरा थेट पोलीस ठाण्यात पोहोचला, बीड हादरलं! मात्र, यावेळी हा वाद इतका विकोपाला गेला की, महेंद्रने सुरेशच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार केले. यात सुरेश गंभीर जखमी होऊन जागीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सावर्डे पोलीस ठाण्याचे निरीक्षक भरत धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला महेंद्रला अटक करण्यात आली असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







