मुंबई, 21 नोव्हेंबर : देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. जवळपास सहा महिन्यांनी घटना उघड झाल्याने हत्या नेमकी कशी झाली याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, ताज्या अपडेटनुसार श्रद्धाची हत्या आधी गळा दाबून झाली नसेल तर.. या थिअरीवर दिल्ली पोलीस काम करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आपला तपास योग्य मार्गावर असल्याचा दावाही दिल्ली पोलिसांनी केला आहे.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील ताजे अपडेट्स
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या दक्षिण रेंजच्या जवळपास 10-12 पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या तुकड्या देशातील वेगवेगळ्या ठिकाणी कसून तपास करत आहेत. आफताब आणि श्रद्धा यांच्या घरातून हाडे, रक्ताचे नमुने, गॅजेट्स आणि सामानाचा समावेश असलेल्या 30-35 हून अधिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. काही प्रवासी कागदपत्रेही जप्त करण्यात आली असून तांत्रिक विश्लेषण सुरू आहे.
वाचा - प्रियकराची पत्नी ठरत होती नात्यात अडसर, रागात पुण्यातील प्रेयसीने केलं भयानक कांड
सर्व सोशल मीडिया अॅप्स आणि अकाउंटचा तपास सुरू आहे. दुसरीकडे आफताबने दिल्ली पोलिसांना सांगितले आहे की, त्याने दिल्लीतील एका तलावात श्रद्धाचे शीर फेकले. यानंतर दिल्ली पोलीस रविवारी संध्याकाळी छतरपूर जिल्ह्यातील मैदान गढी येथे पोहोचले. मात्र, सध्या तलाव परिसरात शोधमोहीम थांबवण्यात आली आहे. आफताबला आता पश्चाताप होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. उद्या त्याची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला पुन्हा व्हिडीओ कॉन्फरसिंगमार्फत हजर केले जाईल.
आफताबला 12 नोव्हेंबरला अटक
दिल्ली पोलिसांनी तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबला 12 नोव्हेंबरला श्रद्धा वालकरच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनावाला याने 18 मे रोजी संध्याकाळी श्रद्धा वालकर (27) हिचा खून केला आणि तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले, जे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या निवासस्थानी सुमारे तीन आठवडे 300 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवले होते. तो अनेक दिवस दिल्लीच्या विविध भागात तिचे तुकडे फेकून देत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.