अमित राय, मुंबई प्रतिनिधी मुंबई, 3 ऑक्टोबर : काही दिवसांपूर्वी अदार पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. मात्र, यावेळी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी करुन एक कोटींहून अधिक रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे. मुख्यमंत्र्यांची सही असलेल्या सरकारी व्यवहारांच्या पेमेंट स्लिप दाखवून फ्रँचायझी उघडण्याचे आमिष दाखवून पालघरमध्ये एका व्यक्तीची 1.31 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वसई तालुक्यातील नालासोपारा येथील रहिवासी जतीन पवार आणि शुभम वर्मा यांच्या विरोधात स्टेशनरी दुकानाचे मालक 50 वर्षीय जिग्नेश गोपानी यांची फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली. राज्य सरकारच्या ई-पोर्टल फ्रँचायझीमध्ये खोलणार असून यामध्ये हिस्सेदारी देण्याच्या नावाखाली तक्रारदार गोपानी यांच्याकडे फी म्हणून एक लाख रुपये मागितले. दोघांनीही सारख्याच वेळा घेतल्या आणि काम सुरू होणार असल्याचे सांगितले. दोघांनी गोपनी यांच्याकडून एकूण एक कोटी 31 लाख 75 हजार 104 रुपये घेतले, असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वाचा - ठाण्यात बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, अमेरिकेतील लोकांना बनवत होते शिकार ते म्हणाले की, 25 ऑगस्ट रोजी आरोपींनी गोपानी यांना ई-पोर्टल फ्रँचायझीसाठी परवाना, परमिट आणि इतर फी भरण्याची स्लिप दिली, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आणि त्यांची इंग्रजीत स्वाक्षरी होती. वालीव पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले. ही स्लिप गोपानी यांना देण्यात आली. मात्र, मुख्यमंत्र्यांची ‘स्वाक्षरी’ संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला, त्यानंतर शनिवारी एफआयआर नोंदवण्यात आला आणि आज एका आरोपीला अटक करण्यात आली, तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
महाराष्ट्रात फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यावर्षी जुलै महिन्यात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या नावाने एका व्यक्तीला फसवणुकीच्या प्रयत्नात अटक करण्यात आली होती. 34 वर्षीय आरोपी मायकुलाल चंदनलाल दिवाकर, उत्तर प्रदेशातील बरेली येथील रहिवासी आहे. ज्याने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांचे बनावट प्रोफाइल तयार करून न्यायालयीन अधिकाऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीने न्यायमूर्ती दत्ता यांच्या नावाचा आणि फोटोचा डीपी व्हॉट्सअॅपवर टाकून न्यायालयाच्या अधिकाऱ्यांकडे अॅमेझॉन पे गिफ्ट कार्ड्स मागितले होते, तसेच उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाच्या अन्य दोन निबंधकांचीही फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता.

)







