कानपूर 03 डिसेंबर : कानपूरमधील कल्याणपूर पोलीस ठाण्यासमोर हेड कॉन्स्टेबलच्या गुंडगिरीमुळे भाजी विक्रेत्यासोबत भयानक दुर्घटना घडली. यात रेल्वेची धडक बसून त्याचे दोन्ही पाय तुटले. घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला हेल्टमध्ये दाखल केलं. प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पीजीआय लखनऊ येथे रेफर करण्यात आलं. भाजी विक्रेत्याशी गैरवर्तन करणाऱ्या हेड कॉन्स्टेबलला डीसीपी पश्चिम यांनी निलंबित केलं आहे. सोबतच या प्रकरणाची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
कल्याणपूर साहेब नगर येथील रहिवासी सलीम अहमद यांचा मुलगा अर्शलान उर्फ लड्डू हा 18 वर्षीय तरुण भाजी विकतो. कुटुंबियांनी सांगितलं की, दररोज प्रमाणे शुक्रवारी संध्याकाळीही तो कल्याणपूर क्रॉसिंगच्या शेजारी जीटी रोडवर भाजी विकत होता. यावेळी इंदिरा नगर चौकीत तैनात इन्स्पेक्टर शादाब खान आणि हेडकॉन्स्टेबल राकेश घटनास्थळी पोहोचले. फूटपाथवर भाजीपाला विकत असल्याने त्यांनी अर्शलानला आधी बेदम मारहाण केली आणि शिवीगाळ करत रेल्वे ट्रॅकवर त्याचा तराजू फेकून दिला.
या घटनेमुळे अर्शलान घाबरला. तो इतका घाबरला होता की त्याला ट्रेन येत आहे हे कळालंच नाही आणि तो क्रॉसिंगवर पडलेला तराजू उचलायला धावला. दरम्यान, त्याला भरधाव वेगात आलेल्या ट्रेनने धडक दिली आणि त्याचे दोन्ही पाय कापले गेले. तिथे उपस्थित लोकांनी पोलिसांच्या मदतीने अर्शलानला हेल्टमध्ये दाखल केलं. यासोबतच अपघाताची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. दोन्ही पाय निकामी झाल्याने तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने अर्शलानची प्रकृती बिघडली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच डीसीपी पश्चिम विजय धुळ घटनास्थळी दाखल झाले. तपासात भाजी विक्रेत्याला मारहाण करून तराजू रेल्वे रुळावर फेकल्याचा आरोप खरा असल्याचं निष्पन्न झालं. यामुळे त्यांनी हेड कॉन्स्टेबल राकेश कुमार यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले. सोबत असलेल्या निरीक्षकाच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसीपी कल्याणपूर विकास पांडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, हा मुलगा जीटी रोडवर रेल्वे मार्गावर टोमॅटो विकत होता. हेड कॉन्स्टेबल राकेश कुमार यांनी येऊन भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण केली. त्याचा तराजू उचलून रेल्वे रुळावर फेकून दिला. त्यामुळे भाजी विक्रेता घाबरला. रेल्वे रुळावरील तराजू उचलायला गेल्यावर तो इतका घाबरला होता की उठूच शकला नाही. दरम्यान, त्याला ट्रेनची धडक बसली आणि त्याचे दोन्ही पाय कापले गेले.
प्रत्यक्षदर्शी सलीम यांनी सांगितलं की, हे सगळं आमच्यासमोर घडलं. कल्याणपूर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल राकेश कुमार यांनी भाजी विक्रेत्याला मारहाण केली. त्याचा तराजू उचलून रेल्वे रुळावर फेकून दिला. तो तराजू उचलण्यासाठी गेला असता ट्रेनने धडक दिल्याने त्याचे दोन्ही पाय तुटले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Shocking news