नवी दिल्ली : अलीकडच्या काळात महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मुंबईतल्या विशेष न्यायालयाने अशाच स्वरूपाच्या एका गुन्ह्यात डीएनए रिपोर्टचा आधार घेऊन आरोपीला 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने 2019पासून त्याच्या सावत्र मुलीवर वारंवार बलात्कार केला. यामुळे पीडिता गर्भवती राहिली. या गुन्ह्यात डीएनए रिपोर्टचा संदर्भ घेऊन न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे.
सावत्र मुलीवर वारंबार बलात्कार
2019पासून स्वतःच्या सावत्र मुलीवर वारंवार बलात्कार करून ती गर्भवती होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुंबईतल्या विशेष न्यायालयाने डीएनए तपासणी अहवालाचा आधार घेऊन एका आरोपीला 20 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पीडितेने आपल्या म्हणण्यावरून माघार घेतली होती. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचं संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत नोंदवलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी विशेष न्यायाधीश अनीस खान यांनी मंगळवारी (29 नोव्हेंबर) दिलेल्या निकालात म्हटलं की, अशा विचित्र परिस्थितीत, डीएनए चाचणी हे प्रकरणाचा तपास, तसंच आरोपीवरचे आरोप सिद्ध करण्याचं प्रभावी माध्यम आहे. या निकालाची प्रत बुधवारी उपलब्ध करून देण्यात आली.
पीडितेचा गर्भपात
ऑक्टोबर 2019 पासून आरोपी पीडितेवर वारंवार बलात्कार करत होता. जून 2020 मध्ये पीडित मुलीने याविषयी तिच्या आईला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तपासणीदरम्यान पीडिता 16 आठवड्यांची गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला.
हेही वाचा: Extra Marital Affair चा संशय, पत्नी आणि तिच्या प्रियकर सरपंचाला बेदम मारहाण
पीडितेने जबाब बदलला
प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पीडिता आणि तिच्या आईने आपला जबाब मागे घेतला. न्यायालयात दिलेल्या जबाबात पीडिता आणि तिच्या आईने दावा केला, की आरोपी हा त्यांच्या कुटुंबातला एकमेव कमावता सदस्य आहे. म्हणून आम्ही त्याला माफ करून तुरुंगातून बाहेर काढू इच्छितो. पीडितेचं विधान हे सिद्ध करण्यासाठी पुरेसं आहे, की तिला तिच्या आईकडून भावनिक दबाव येत आहे आणि म्हणून तिनं गुन्हा घडल्याचं सांगण्यास नकार दिला आहे, असं न्यायालयाने म्हटलं. केवळ पीडित मुलगी आणि तिच्या आईने जबाब फिरवला याचा अर्थ फिर्यादी खटला फेटाळला जाईल असं नाही, असंदेखील न्यायालयाने स्पष्ट केलं.
हेही वाचा : मुंबईच्या रस्त्यावर कोरियन तरुणीसोबत लाज वाटणारे कृत्य, तरुणाने हात पकडला आणि... VIDEO
डीएनए रिपोर्ट महत्त्वाचा
अशा परिस्थितीत डीएनए चाचणी हे तपासाचं, तसंच आरोपीवरचा आरोप सिद्ध करण्याचं प्रभावी माध्यम आहे. या प्रकरणात, डीएनए चाचणीने पीडित मुलगी आणि आरोपी हे भ्रूणाचे जैविक पालक असल्याचं सिद्ध झालं आहे, असं न्यायालयाने सांगितलं. रक्ताचे नमुने घेणं, ते प्रयोगशाळेत जमा करणं आणि त्याची तपासणी करण्याची प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली आहे, त्यामुळे अंतिम डीएनए रिपोर्ट स्वीकारावा लागेल, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Mumbai, Mumbai News