मुंबई, 19 ऑगस्ट : देशातील दरदिवशी चोरीच्या असंख्य घटना घडतात. परंतु, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये चोरीच्या आरोपावरून एका महिलेला अटक झाल्यानंतर तिनं केलेल्या चोऱ्यांची पद्धत पाहून पोलिसही चकित झाले. त्या महिलेनं एक, दोन नव्हे तर तब्बल 100 घरांमध्ये चोरी केली आहे. विशेष म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरात चोरी करण्यासाठी जाताना ती विमानातून प्रवास करायची. चोरीच्या माध्यमातून जमा केलेल्या पैशांतून त्या महिलेने दिल्लीत एक प्लॉट खरेदी केला अन् घरही उभारलंय. ‘आज तक’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे. अनेक शहरांत चोरी करणाऱ्या महिलेचं नाव पूनम शाह ऊर्फ काजल असं आहे. ती मूळ बिहारमधील भागलपूरची रहिवासी आहे. तिनं दिल्ली एनसीआर (Delhi NCR) भागात 26 पेक्षा अधिक चोऱ्या केल्या आहेत. काजलनं दिल्ली, जोधपूर, कोलकाता आणि गाझियाबादसह विविध शहरांत चोऱ्या केल्या आहेत. गाझियाबाद पोलिसांनी बुधवारी (17 ऑगस्ट 22) काजलला पकडलं आहे. काय होती पद्धत? काजलने दिल्लीसह विविध शहरांमध्ये चोऱ्या केल्या आहेत. एखाद्या घरात मोलकरीण (House Helper) म्हणून ती दाखल होत असे आणि नंतर चोरी करून पसार व्हायची. गाझियाबाद येथील विपुल गोयल यांच्या घरातही ती मोलकरीण म्हणून दाखल झाली. तिथे तिनं चोरी केली. अशा एकूण 100 चोऱ्या केल्याची कबुली तिनं दिली आहे. एनसीआर भागात तिनं 26 पेक्षा अधिक चोऱ्या केल्या आहेत. विशेष म्हणजे चोरीसाठी एका शहरातून दुसरीकडं जाताना ती विमानाचा प्रवास करत होती. तिच्यावर गँगस्टर कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. चोरीच्या पैशांतून उभारलं घर काजल सुरूवातीला दिल्लीतील उत्तमनगर भागात राहत होती. नंतर तिनं विविध शहरांमध्ये चोऱ्या करणं सुरू केलं. याद्वारे आलेले पैसे तिनं जमवले व दिल्लीच्या उत्तमनगर भागातच प्लाटची खरेदी केली. चोरी केलेले दागिने विकून तिनं घर उभारलं असल्याचं पोलीस तपासात समोर आलयं. क्षुल्लक गोष्टी मोठ्या करणाऱ्या पत्नीला हायकोर्टाचा दणका, पती आणि सासूची निर्दोष मुक्तता कशी अडकली जाळ्यात? काजल काही दिवसांपूर्वी गाझियाबाद येथील विपुल गोयल यांच्या घरात मोलकरीण म्हणून कामाला आली. काही दिवस काम केल्यानंतर तिनं त्यांच्या घरातील 10 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. या प्रकरणात पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि त्या आधारावर 30 वर्षीय काजलवर पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर त्यांनी आम्रपाली व्हिलेज सोसायटी येथून तिला ताब्यात घेतल्याचं इंदिरापुरम येथील सीओ अभय मिश्रा म्हणाले. काजलजवळ असलेले 3 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. यवतमाळमध्ये शिक्षिकेवर तरुणाचा हल्ला, परिसरात खळबळ, नेमकं काय घडलं? विपूल गोयल यांच्या घरी झालेल्या चोरीच्या अनुषंगाने पोलिसांनी काजलची कसून चौकशी केली. या चोरीमध्ये काजलसोबत तिचा साथीदार बंटी असल्याचं समोर आलं. दोघांनी मिळून चोरी करण्याचा पूर्ण प्लॅन आखला होता. काजलने विपुल गोयल यांच्या पत्नीला बोलण्यात व्यस्त ठेवलं आणि नजर चुकवून बंटीने कपाटातून दागिने चोरले. यानंतर चोरीच्या दागिन्यांसह दोघेही ऑटोरिक्षाने सोसायटीतून पसार झाले आणि त्यांनी चोरीच्या दागिन्यांची वाटणी करून घेतली. या प्रकरणातील बंटी आणि चोरीचे दागिने विकत घेणारा सराफा व्यावसायिक फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असून त्यांना लवकरच गजाआड केलं जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.