जयपूर, 10 जुलै : राजस्थानातील (Rajasthan) बाडमेर जिल्हा रुग्णालयातून तीन दिवसांपूर्वी चोरी झालेलं तीन दिवसांचं बाळ अखेर सापडलं आहे. 3 दिवसांपूर्वी रुग्णालयातून एक बाळ चोरीला गेलं होतं. यानंतर त्याची आई सतत रडत होती. बाळ हरविल्यापासून आईने अन्नाचा एक कणही घेतला नव्हता. ती सतत बाळाची आठवण काढून रडत होती. आईच्या ती अवस्था पाहून रुग्णालयातील प्रत्येक व्यक्तीचं हृदय हेलावत होतं. (A three-day-old baby that was stolen three days ago has finally been found)
दरम्यान रुग्णालयातून चोरी केलेल्या बाळाचा पोलिसांकडून शोध सुरू होता. अचानक बाडमेर पोलीस चौकीपासून तब्बल 100 मीटर अंतरावर एका पायी चालणाऱ्या व्यक्तीची नजर बाळाला ठेवलेल्या बॅगेवर पडली. त्याने रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याना याची सूचना दिली. ज्यानंतर बाळाला रुग्णालयात आणण्यात आलं.
बाडमेरमधील मेकिडल कॉलेजच्या वॉर्डमधून 3 दिवसांचं बाळ चोरी झालं होतं. बाळाचे वडील पहाटे 5 वाजता वॉर्डमध्ये गेले तर तेथे बाळ नव्हतं. त्यांनी याबाबत रुग्णालयातील नर्सला माहिती दिली. रुग्णालय प्रशासनाकडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने त्याने पोलिसात तक्रार केली. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात लावलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत होते. शिवाय सुरक्षा गार्डदेखील ड्यूटीवर नव्हता.
हे ही वाचा-लग्नासाठी महाराष्ट्रातल्या मुलीची केली निवड; मात्र सप्तपदीपूर्वीच नवरी फरार
पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितलं की, कोणीतरी रस्त्याजवळ बाळाला आणून ठेवलं होतं. या प्रकरणात तपास सुरू आहे. पोलीस पुढे म्हणाले की, कोणी ओळखीच्या व्यक्तीने बाळाचं अपहरण केल्याची शक्यता आहे. आईची अवस्था पाहून त्याला दया आली व त्यांनी बाळाला परत केलं अशी शक्यता आहे. सध्या बाळाची प्रकृती ठीक आहे. मात्र अपहरणकर्त्याने बाळाची चांगली काळजी घेतल्याचं दिसत आहे. या प्रकरणात रुग्णालयाच्या नर्सविरोधात कारवाई करण्यात आली असून ड्यूटीवर असलेल्या नर्सला निलंबित करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Baby kidnap, Crime news, Kidnapping, Rajasthan