आरा, 31 जानेवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधल्या आरा शहरातल्या कतिरा मोहल्ला या उच्चभ्रू भागात काही अज्ञातांनी घरात घुसून एका वृद्ध प्रोफेसर दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या घटनेनंतर सर्वत्र भीतीचं वातावरण असून, हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस तपास सुरू असून, हत्या का करण्यात आली आणि कोणी केली असावी, याबद्दल अद्याप काहीही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
70 वर्षांचे प्राध्यापक महेंद्रसिंह यांनी वीर कुंवरसिंह विश्वविद्यालयाचे डीन म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांची 65 वर्षांची पत्नी पुष्पा सिंह यांनी महिला कॉलेजमध्ये सायकॉलॉजी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून काम पाहिलं होतं. दोघंही रिटायर्ड होते. रोहतास जिल्ह्यातल्या नासरीगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेलं अग्नी हे या दाम्पत्याचं मूळ गाव; मात्र रिटायरमेंटनंतर हे दाम्पत्य गेली अनेक वर्षं आरा शहरातल्या कतिरा भागातल्या घरात राहत होतं. त्यांच्यासोबत आणखी कोणीही नव्हतं.
या दोघांची हत्या झाल्याचं कळताच भोजपूरचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार यादव आणि एएसपी हिमांशू मोठ्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. नेमकं काय झालं असावं आणि हे कोणी केलं असावं, याचा तपास केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळ सील केलं असून, पाटण्यातल्या फॉरेन्सिक तपास टीमला पाचारण केलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रत्येक शक्यतेचा विचार आणि तपास केला जात आहे.
हत्या नेमकी का झाली आणि कोणी केली असावी, याचा अद्याप शोध लागलेला नाही; मात्र एकंदर परिस्थितीवरून असं दिसत आहे, की आरोपींनी पहिल्यांदा या दोघांच्या डोक्यावर कशाने तरी वार केला आणि त्यानंतर धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली असावी. कारण मृत दाम्पत्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा दिसून आल्या आहेत.
हेही वाचा - पालघर : चारित्र्याचा संशय पत्नीसोबत पतीचं धक्कादायक कृत्य, चिमुकल्यांनी फोडला टाहो
या दुहेरी हत्याकांडाची उकल करण्यासाठी पोलीस मोबाइल सर्व्हेलन्स आणि सीसीटीव्ही फूटेजचाही आधार घेत आहेत. त्यामुळे, या घटनेवेळी घरात नेमकं कोण होतं, बाहेरून कोण आणि कसं घरात आलं होतं, याचा शोध त्याच्या साह्याने पोलिसांना घेता येणार आहे.
मृत प्रा. महेंद्र सिंह यांचे धाकटे बंधू हीरा सिंह यांनी सांगितलं, की ते 26 जानेवारीला त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. त्यानंतर आज त्यांच्या सर्वांत मोठ्या भावाने त्यांना फोन करून कळवलं, की दोघांचाही फोन लागत नाहीये. त्यामुळे हीरा सिंह महेंद्र सिंह यांच्या घरी आले, तेव्हा त्यांना पोलिसांनी माहिती दिली, की या दाम्पत्याची घरातच निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Local18, Murder, Wife and husband