लखनऊ, 21 जानेवारी : उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील त्रिवेणीनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडलीय. ‘आय अॅम लूजर... आय फिनिश्ड माय सेल्फ...!’ असं स्टेटस व्हॉट्सअॅपला ठेऊन एका बँक कर्मचाऱ्यानं गुरुवारी (19 जानेवारी 2023) रात्री अकराच्या सुमारास राहत्या घरात स्वतःच्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केलीय. अजय कुमार सिंग (वय 24) असं आत्महत्या करणाऱ्याचं नाव आहे.
या प्रकरणी अजयकुमार याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अजय कुमार हा काम करीत असलेल्या बँकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अजय कुमार हा कोटक महिंद्रा या खासगी बँकेच्या सप्रू मार्ग शाखेत रिकव्हरी एजंट म्हणून काम करीत होता. त्याने लखनऊ येथील त्रिवेणी नगर परिसरात त्याच्या राहत्या घरी गुरुवारी रात्री उशिरा वडिलांच्या परवाना असलेल्या बंदुकीतून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केलीय. शुक्रवारी शवविच्छेदन करून अजयचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलाय.’
हेही वाचा : अरे चोरा! साथीदारांची नजर चुकवत चोरट्याने केलं असं काही की...; VIDEO VIRAL
अजयच्या वडिलांचे नाव जितेंद्र आणि आईचे नाव केशकाली आहे. त्याला तीन बहिणी आहेत. अजयच्या मृत्यूनं संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. अजयच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार होता, हे कोणाच्याही लक्षात आलं नसल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्याच्या डोक्यात असे काही विचार सुरू असल्याची थोडी जरी कल्पना आली असती, तर त्यांनी त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून केलं असतं, असेही नातेवाईकांनी सांगितलं.
त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजयचे वडिल जितेंद्र कुमार सिंग हे मूळचे उन्नावच्या मौरनवा येथील रहिवासी आहेत. ते सध्या त्रिवेणी नगर येथे राहतात. मृत अजय कुमार हा कोटक महिंद्रा बँकेच्या सप्रू मार्ग शाखेत रिकव्हरी एजंट होता. जितेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘घटनेच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी अजय रात्री अकराच्या सुमारास स्वतःच्या खोलीत गेला. सुमारे एक तासानंतर खोलीतून गोळीबाराचा आवाज आला. त्यामुळे घरातील सर्वजण अजयच्या खोलीकडे पळाले, तेव्हा त्यांना अजय रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याला तातडीने ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.’
हे वाचा - बापरे! UFO की आणखी काही? VIRAL VIDEO पाहून सर्वांना भरली धडकी; इथं पाहा त्याचं सत्य
ऑफिसच्या ताणामुळे मुलाचा जीव गेल्याचा वडिलांचा आरोप
जितेंद्र यांना त्यांचा मुलगा अजयच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला आहे. त्यांनी मुलाच्या मृत्यूला त्याच्या ऑफिसमधील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आरोप केलाय. ते म्हणाले की, ‘अजय काही दिवसांपासून ऑफिसमधील कामामुळे तणावत असल्याचे जाणवत होतं. आम्ही त्याला विचारलं तर तो सर्व काही ठीक होईल, असे सांगत होता. गुरुवारीही तो ऑफिसमध्ये गेला होता. परत घरी आल्यावर तो फार काही बोलला नाही. रात्री झोपण्यासाठी खोलीत गेला, व तिथे त्याने स्वतःवर गोळी झाडली. ऑफिसच्या तणावामुळे माझ्या मुलाला जीव गमवावा लागला.’
पोलिसांच्या तपासात समोर आली महत्त्वाची गोष्ट
या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या तपासात अनेक महत्त्वाची तथ्यं समोर आली आहेत. अजय बराच काळापासून त्रस्त होता. त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरून ही गोष्ट कळली. आत्महत्येच्या काही वेळापूर्वी त्यानं व्हॉट्सअॅप स्टेटसवर लिहिलं होतं की, ‘आय अॅम लूजर... आय फिनिश्ड माय सेल्फ...!’
तर, घटनेच्या काही दिवसांपूर्वीच अजयनं स्टेटस ठेवलं होतं की, ‘कल हो ना हो….’. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्या आत्महत्येमागे तणाव हे एक कारण असून, पोलीस त्यादृष्टीनेही तपास करीत आहे. अजयच्या वडिलांनी आरोप केलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या विरोधात पुरावे आढळल्यास कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केलं. दरम्यान, या प्रकरणानं संपूर्ण त्रिवेणी नगर परिसर हादरला आहे. अजयच्या आत्महत्येमागे आणखी दुसरे कोणते कारण असू शकते का? याचाही पोलिस तपास करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.