पुणे, 14 जानेवारी : शेअर मार्केटमध्ये झटपट पैसे कमावण्याच्या नादात एका कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाल्याची मन हेलावून टाकणारी पुण्यात घडली आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाल्यामुळे केशवनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. मात्र, यात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंजिनीअर तरुणाने आपल्या शिक्षणासोबत शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला. सुरुवातीला बक्कळ नफा कमवला. अनेकांना प्रेरित करून त्यांच्यांकडून पैसेही घेतले. मात्र, बाजारात सातत्याने मंदी येत गेल्याने तो निराशेत गेला आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं. आई-वडील आणि बहिणीसह स्वतःच्याही जेवणात विष कालवून संपूर्ण कुटुंबच संपवलं. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातलं हे कुटुंब होतं. ही घटना पुण्यातील मुंढावा भागात घडली आहे.
पुण्यातील मुंढवा परिसरात केशवनगरमध्ये राहणाऱ्या थोटे कुटुंबातील चार जणांच्या आत्महत्येने खळबळ उडाली होती. दीपक पुंडलिक थोटे (वय 59), इंदू दीपक थोटे (वय 45), ऋषिकेश दीपक थोटे (वय 24) आणि समीक्षा दीपक थोटे (वय 16 वर्ष) अशी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
वाचा - Pune Crime News : घटस्फोटाचा निकाल लागला अन् तरुणाचा मृत्यू झाला, कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप
शेअर मार्केटच्या पैशातून आधी घर बांधलं..
जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील रविदास नगर येथील रहिवाशी दीपक थोटे यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताचीच होती. त्यांनी आपल्या मुलाचे शिक्षण दर्यापूर या ठिकाणी पूर्ण केले. मुलाने इंजीनिअरची पदवी मिळवली होती. तर सर्वात लहान मुलगी शिक्षण घेत होती. मुलगा ऋषिकेश थोटे हा इंजिनीअर झाल्यानंतर त्याने शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला. त्यामध्ये त्याला आधी नफा मिळत गेला. त्यातून त्याने दर्यापूर येथे नवीन घर बांधलं. काही दिवसात शेती घेण्याचाही विचार ऋषिकेश करत होता. ऋषिकेशला वारंवार शेअर मार्केटमध्ये नफा दिसत होता. त्याने दर्यापूर शहरातील कित्येक लोकांपासून पैसा घेतला आणि तो पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला. नंतर ऋषिकेश हा आपल्या कुटुंबाला घेऊन एक वर्षापूर्वी पुण्यात राहण्यासाठी गेला. पुण्यात तो एका खासगी कंपनीमध्ये कामही करत होता.
ऋषिकेशने शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये गुंतवले होते, अशी माहिती समोर येत आहे. मात्र, शेअर मार्केटमध्ये मंदी आल्याने ऋषिकेश थोटे हा नैराश्यात गेला होता. लोकांपासून लाखो रुपये घेतल्याने पैसा कसा परत करावे? या चिंतेत ऋषिकेश होता. पण या संकटातून बाहेर पडण्याऐवजी त्याने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या कुटुंबातील आई-वडील आणि लहान बहिणीच्या जेवणातही त्याने विष कालवलं. या घटनेत थोटे कुटुंबातील चारही सदस्यांचा धक्कादायक मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Suicide case