नांदेड, 31 मे: मद्याची घरपोच सेवा द्यायला गेलेल्या एका डिलीव्हरी बॉयकडून (Delivery boy) पोलिसांनी मद्याची पिशवी पळवल्याची (police snatched liquor bag) धक्कादायक घटना समोर आली आहे. या संतापजनक प्रकारानंतर पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. खरंतर कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांना दैनंदिन गोष्टी खरेदी करता याव्यात, यासाठी अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी 11 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
त्याचबरोबर दारूची दुकानं आणि बिअर बार चालकांना सकाळी 8 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत घरपोच सेवेसाठी दुकाने खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे, असं असताना मद्याची घरपोच सेवा द्यायला गेलेल्या डिलीव्हरी बॉयला पोलिसांनीच लुटलं आहे. संबंधित घटना नांदेड जिल्ह्यातील जंगमवाडी याठिकाणी घडली आहे. एका दारुच्या दुकानाचा डिलीव्हरी बॉय शुक्रवारी (28 मे) संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास पिशवीत मद्याच्या बाटल्या घेऊन घरपोच सेवा देण्यासाठी गेला होता.
दरम्यान भाग्यनगर पोलीस ठाण्यातील डी. बी. पथकातील दोन पोलीस कर्मचारी दुचाकीवर त्याठिकाणी आले. त्यांनी संबंधित डिलीव्हरी बॉयला थांबवलं आणि पिशवीत काय आहे? अशी विचारणा केली. यावेळी डिलीव्हरी बॉयने घाबरत पिशवीत दारुच्या बाटल्या असल्याचं सांगितलं. पिशवीत दारुच्या बाटल्या असल्याचं कळाल्यानंतर संबंधित पोलिसांनी 'तू लॉकडाऊनमध्ये दारूची विक्री करत आहेस का? असा जाब विचारत त्याच्या थोबाडीत (police beat delivery boy) लगावली. यानंतर त्यांनी डिलीव्हरी बॉयच्या हातातील मद्याची पिशवी हिसकावली आणि दुचाकीवरून फरार झाले.
हे ही वाचा-परमबीर यांच्या सांगण्यावरूनच वाझेकडून वसुली, कार डिझायनरचं CM ना पत्र
संबंधित डिलीव्हरी बॉयने दुसऱ्या पोलीस ठाण्यात चौकशी केली असता, या दारूच्या पिशवीबाबत कोणतीही नोंद केली नसल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. यापूर्वी पोलिसांनी संबंधित डिलीव्हरी बॉयकडून दोन वेळा मद्याच्या पिशव्या हिसकावल्याचंही त्यानं सांगितलं आहे. 20 दिवसांपूर्वी दुकानातून क्वार्टरचे दोन बॉक्स घरपोच देण्यासाठी जात असताना, पोलिसांनी दोन्ही बॉक्स घेऊन गेले. या मद्याची बाजरातील किंमत 30 हजार रुपये असल्याचंही पीडित व्यक्तीने सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Liquor stock, Nanded, Police, Theft