नोएडा 14 जून : चोरी झालेली (Theft) वस्तू, पैसे परत मिळणं ही अतिशय कठीण बाब असते. त्यामुळं पोलिसांनी चोरांना पकडून चोरीचा माल जप्त करून मूळ मालकाला परत दिला की त्याला आनंद होतो. मात्र, नोएडात काही किलो सोनं आणि कोट्यवधीची संपत्ती परत घेण्यासाठी मालक तयार नसल्याचं बघून पोलिसही चक्रावले आहेत. या मालमत्तेशी आपला काहीही संबंध नसल्याचं सांगत ज्या घरातून याची चोरी झाली त्या व्यक्तीनं चक्क कानावर हात ठेवत तो मी नव्हेच! असा पवित्रा घेतला आहे.
नोएडामध्ये (Noida) पोलिसांनी 13 किलोपेक्षा जास्त सोन्याची बिस्किटं, दागिने, 57 लाख रुपये आणि एक स्कॉर्पिओ कार चोरणाऱ्या सहा चोरांना मुद्देमालासह अटक केली. या चोरीबरोबरच ग्रेटर नोएडामधील (Greater Noida) सिल्व्हर सिटी सोसायटीत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या 40 किलो सोनं (Gold) आणि साडे सहा कोटी रुपयांच्या (Cash) चोरीचाही छडा लागला. ज्या घरातून ही चोरी झाली होती, त्याचाही तपास पोलिसांना लागला आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे या घराच्या मालकानं सापडलेला मुद्देमाल आपला नसल्याचं म्हटलं आहे. नोएडा पोलिसांच्या मते हे घर किसलय पांडे (Kisalay Pandey) नामक एका व्यक्तीनं दुसऱ्याच नावानं भाड्यानं घेतलं होतं. किसलय पांडे आणि त्याचे वडील राममणी पांडे यांच्यावर दिल्ली आणि एनसीआरमध्ये कोट्यवधी रुपयांच्या फसवेगिरीचा आरोप आहे. किसलय पांडे स्वतः सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) वकील असल्याचं सांगतो, पण त्याची डिग्रीही खोटी असल्याचं नोएडा पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे.
भयंकर! नरभक्षक व्यक्तीच्या फ्लॅटमधून हजारो मानवी हाडे जप्त
किसलय पांडे म्हणे तो मी नव्हेच !
किसलय पांडे यानं ते घर, तिथं झालेल्या चोरीतलं 40 किलो सोनं आणि 6.5 कोटींची रोख रक्कम याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. नोएडा पोलिसांनी दुसऱ्या एका चोरीच्या प्रकरणात पकडलेल्या चोरांकडे हा आधीच्या चोरीतील प्रचंड मुद्देमाल सापडल्यानं आधीचं चोरी प्रकरण उघडकीस आलं. याप्रकरणी चौकशी करताना बनवेगिरी करणाऱ्या किसलय पांडेचे प्रकरण पुढं आलं. मात्र किसलय पांडेनं ट्विटरवर, आपण पोलिसांना सर्व सहकार्य करत असून आपला लढा देशाला लुटणाऱ्या लोकांशी असल्याचं सांगत खळबळ माजवली आहे.
पोलिसांचा दावा
नोएडा पोलिसांनी हा सगळा मुद्देमाल किसलय पांडेचाच असल्याचा दावा केला आहे. या चोरीचा मास्टरमाईंड किसलय पांडेचा केअर टेकर गोपाल आणि ड्रायव्हर आहे. तर किसलय पांडे यानं आपला कोणी केअर टेकर असल्याचं साफ नाकारलं असून, या सगळ्या खोट्या गोष्टी असल्याचं म्हटलं आहे. आपल्यावर दाखल असणारे फसवणुकीचे गुन्हेही 18-19 वर्षे जुने असल्याचंही त्यानं स्पष्ट केलं आहे.
शाळेत नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नागपूरातील 25 वर्षीय नराधमाला अटक
काय आहे नेमकं प्रकरण
ग्रेटर नोएडामधील सिल्व्हर सिटी सोसायटीत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका घरातून 40 किलो सोनं आणि साडे सहा कोटी रुपयांच्या रोख रकमेची चोरी झाली होती; पण पोलिसांना चोरी कोणत्या घरातून झाली आणि त्या घराचा मालक कोण आहे याचा तपास लागला नव्हता. इतकी मोठी रोख रक्कम असल्यानं ईडी आणि प्राप्तिकर विभागही याचा तपास करत होते. त्याचवेळी नोएडा पोलिसांनी 14 किलो सोनं आणि 57 लाखांची रोख रक्कमेसह सहा लोकांना अटक केली. त्यावेळी या टोळीनं गेल्या वर्षी केलेल्या चोरीचाही (Robbery) उलगडा झाला. सोन्याच्या वाटणीवरून वाद झाल्यानं पोलिसांना याची खबर मिळाली आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.
पोलीस या चोरांना घेऊन सिल्व्हर सिटी सोसायटीत गेले तेव्हा चोर ज्या घरात चोरी केली होती ते ओळखू शकले नाहीत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत या चोरीचा मास्टर माईंड गोपाल असून, तो सर्वोच्च न्यायालयातील कथित वकील किसलय पांडे याचा केअर टेकर असल्याचं समजलं. त्या आधारावर ज्या घरात चोरी झाली ते घर किसलय पांडे यांचं असल्याचा दावा पोलिसांनी केला. गोपाल यानं गाझियाबाद आणि नोएडातील सालारापूरमधील 9 लोकांच्या मदतीनं ही चोरी केली होती. चोरी करताना गोपालबरोबर जी व्यक्ती घरात शिरली होती ती फरार आहे आणि इतर लोक दूर थांबलेले असल्यानं त्यांना त्या घराबद्दल काही माहिती नसल्याचं स्पष्ट झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Theif