सांगली, 24 जुलै : अवघ्या एका दिवसाच्या बाळाचं अपहरण करणाऱ्या महिलेचा आणि बाळाचा काही तासांतच पोलिसांनी छडा लावला आहे. महिलेला अटक करत बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयामध्ये महिलेच्या प्रसूतीनंतर तिच्या बाळाचे अपहरण झाल्याचा प्रकार रविवारी सकाळी तासगावमध्ये घडला होता. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयातील नर्सने हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. तासगाव शहरातल्या सिद्धेश्वर चौक या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टर अंजली पाटील यांच्या रुग्णालयामध्ये प्रसूती झालेल्या एका महिलेच्या अवघ्या एक दिवसाच्या बाळाचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला होता. सदरची महिला हे बाळाला एका बॅगमध्ये घालून रुग्णालयामधून बाहेर पडल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात झालं होतं. त्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. सांगली पोलीस दलाने त्या बाळाचा आणि महिलेचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तैनात करत रवाना केली होती. ( उद्धव ठाकरेंनी पुन्हा उडवली राज ठाकरेंची खिल्ली, खोचक शब्दांत म्हणाले…. ) अवघ्या सहा ते सात तासांमध्ये महिलेचा शोध घेत, सातारा जिल्ह्यातील भवानीनगर इथल्या शेणोली रेल्वे स्थानकाजवळ या महिलेला ताब्यात घेण्यात आलं आणि तिच्याकडून असणारा बाळाचे सुखरूप सुटका करण्यात आली. स्वाती माने असं या अपहरण महिलेचं नाव आहे. ती सध्या वाळवा तालुक्यातील येडेमच्छिन्द्र येथे वास्तव्यास होती. ती मूळची सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावची आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी नर्स म्हणून स्वाती माने ही नोकरीला लागली होती. आणि रुग्णालयात नर्स म्हणून काम करण्याचा फायदा उचलत प्रसुती झालेल्या महिलेच्या एक दिवसाच्या बाळाचे अपहरण केलं आणि तिथून पलायन केलं होतं. दरम्यान तासगाव पोलिसांच्याकडून या महिलेची कसून चौकशी सुरू आहे. तिने हे अपहरण नेमकं कोणत्या कारणाने केलं? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. याप्रकरणी तासगाव पोलीस अधिकचा तपास करत आहेत. मात्र अवघ्या एका दिवसाच्या बाळाच्या अपहरणाच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.