मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! गुप्त धनाच्या हव्यासापोटी नरबळी देण्याच्या उद्देशाने तीन वर्षीय मुलीचं अपहरण? पुण्यात खळबळ

धक्कादायक! गुप्त धनाच्या हव्यासापोटी नरबळी देण्याच्या उद्देशाने तीन वर्षीय मुलीचं अपहरण? पुण्यात खळबळ

आरोपी सीसीटीव्हीत कैद

आरोपी सीसीटीव्हीत कैद

पिंपरी चिंचवडमध्ये गुप्त धनाच्या हव्यासापोटी नरबळी देण्याच्या उद्देशाने एका तीन वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांनी पीडित चिमुकलीची सुखरुप सुटका केली आहे.

पुणे, 24 जुलै : सांगलीत एका नर्स महिलेने एका दिवसाच्या अर्भकाची रुग्णालयातून अपहरण केल्याची बातमी ताजी असताना पुण्यातून देखील असाच काहिसा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये गुप्त धनाच्या हव्यासापोटी नरबळी देण्याच्या उद्देशाने एका तीन वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. संबंधित प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आलं आहे. आरोपी चिमुकलीला अपहरण करुन जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्या आधारावर पोलिसांनी आरोपींचा छडा लावला.

विशेष म्हणजे मुलगी हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमधील जवळपास 200 पोलीस कार्यरत झाले होते. या सर्व पोलिसांनी शहरात मुलीचा शोध घेतला. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी जीव ओतून तपास केला. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि अवघ्या 24 तासांच्या आत आरोपींच्या तावडीतून पोलिसांनी मुलीची सुटका केली.

(...आणि बाळाची चोरी करणारी नर्स पोलिसांनी पकडली, थरारक तपास, अर्भकाची सुटका)

या प्रकरणी विमल संतोष चौगुले, संतोष मनोहर चौगुले, सुनीता अशोक नलावडे, निकिता अशोक नलावडे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर सर्वांना 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर ज्या भोंदू बाबाच्या सांगण्यावरून मुलीचं अपहरण केलं गेलं त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपींनी मुलीचं नरबळीसाठी अपहरण केलं की विकण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी अपहरण केलं होतं याचा तपास घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मुलीचं अपहरण नरबळीसाठी करण्यात आल्याची शंका पीडित मुलीच्या कुटुंबंयांनी व्यक्त केली होती. पण पोलिसांनी आपल्याला त्याबाबत अजून ठोस माहिती उपलब्ध झालेली नाहीय, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

First published:

Tags: Crime, Kidnapping