मुंबई, 24 ऑक्टोबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत एका 28 वर्षीय तरुणाकडे पाहिल्याच्या रागातून झालेल्या भांडणात तीन जणांनी एकाचा खून केल्याची घटना घडली आहे. रोनित भालेकर असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. काय आहे संपूर्ण प्रकरण - याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, पीडित रोनित भालेकर हा घटनेच्या वेळी मित्रासोबत मद्यधुंद अवस्थेत होता. ही घटना रविवारी पहाटे माटुंगा परिसरातील एका रेस्टॉरंटजवळ घडली, त्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली. रोनित भालेकर हा कॉल सेंटरमध्ये काम करायचा. याप्रकरणी पोलिसांनी पुढे सांगितले की, भालेकर याचे तीन आरोपींपैकी एकाकडे पाहण्यावरून भांडण झाले होते. यानंतर आरोपींनी पीडित तरुणाला जोरदार मारहाण केली. या मारहाणीत भालेकर जागेवरच बेशुद्ध झाला. यानंतर त्याला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. हेही वाचा - बहिणीच्या लव्ह मॅरेजवरुन सतत टोमणे मारायचा मित्र; तरुणाने धडा शिकवण्यासाठी गाठला क्रूरतेचा कळस याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच आरोपींना रविवारी स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







