मुंबई, 20 फेब्रुवारी : काही गुन्हेगार अतिशय चलाख असतात. त्यांची गुन्हा करण्याची पद्धत आणि त्यानंतर दडून राहण्याच्या पद्धतीचा सहजासहजी माग काढता येत नाही. त्यामुळे असे गुन्हेगार लवकर पोलिसांच्या जाळ्यात अडकत नाहीत. मात्र, पोलीस शेवटी पोलीस असतात, एखाद्या गुन्हेगाराचा माग काढण्याचा निश्चय जर त्यांनी केला तर त्याला पकडल्याशिवाय ते शांत बसत नाहीत. मुंबईमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. एका ज्वेलरच्या मालकीचं 23 लाख रुपये किमतीचं सोनं घेऊन फरार झालेल्या एका व्यक्तीला पोलिसांच्या पथकानं बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी आपल्या एका कर्मचाऱ्याला सिम कार्ड सेल्समनच्या वेशात राजस्थानमधील कारखान्यात पाठवलं होतं. दहिसरमधील घटना दहिसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी चारकोप येथील सोन्याचे दागिने पॉलिशिंग युनिटचे मालक सुनील आर्य यांनी पोलिसांकडे आपल्या एका कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दिली होती. आर्य यांनी 26 वर्षीय राजू सिंग याच्याकडे दहिसर येथील कारखान्यात पोहोच करण्यासाठी 453 ग्रॅम सोनं दिलं होतं. मात्र, सिंग दिलेल्या पत्त्यावर न पोहोचता सोनं घेऊन पळून गेला. अनेक तास वाट बघितल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं आर्य यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. हेही वाचा : आणखी एक श्रद्धा! प्रेमप्रकरणातून तरुणीसोबत भयानक कांड; 25 दिवसानंतर पोलिसांनी विहिरीतून काढले मृतदेहाचे तुकडे मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास पोलिसांनी आरोपी सिंगचं मोबाईल फोन लोकेशन आणि कॉल डेटा रेकॉर्डच्या आधारे तपास सुरू केला. तो राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील एका गोल्ड पॉलिशिंग कारखान्यात असल्याचं निदर्शनास आलं. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचण्याचा विचार केला. लक्षवेधी ऑफर देऊन सिम कार्ड विकण्याच्या बहाण्यानं शनिवारी (18 फेब्रुवारी) पोलिसांनी आरोपी काम करत असलेल्या कारखान्यात प्रवेश केला. हेही वाचा : फुकटात आयफोन पाहिजे म्हणून तरुणाचे डिलिव्हरी बॉयसोबत भयानक कांड, पोलिसांनाही बसला धक्का पाठलाग करत राजस्थानला पोहोचले वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी सांगितलं, “आम्ही त्याचा पाठलाग करत आहोत हे सिंगला कळू दिलं नाही. तो काम करत असलेल्या कारखान्याजवळ पोहोचल्यावर आम्ही तत्काळ सापळा रचण्याचा विचार केला. कारखान्याच्या जवळ असलेल्या मोबाईल सेवा पुरवठादार कर्मचार्यांकडून आम्ही काही लाल टी-शर्ट घेतले. ते घालून आम्ही कारखान्यात प्रवेश मिळवला.” आरोपीला अटक पाटील म्हणाले, “आम्ही सिंगला कारखान्यात पाहिल्यानंतर त्याला अटक केली.” त्याच्या सामानाची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्या बॅगेत लुटलेलं सोनं आढळलं. हे सोनं विकण्यासाठी तो चोरीच्या प्रकरणाची चर्चा थंड होण्याची वाट बघत होता. आरोपी राजू सिंगला रविवारी मुंबईत आणण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







