छतरपूर, 22 फेब्रुवारी : मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्याजवळील बागेश्वर धाम येथील पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री अर्थात बागेश्वर महाराज यांचा धाकटा भाऊ शालिग्राम याच्यावर अनुसूचित जातीच्या कुटुंबाला धमकावल्याचा आरोप आहे. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिसांनी आरोपी शालिग्रामच्या विरोधात एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केलाय. ‘आज तक’ ने याबाबत वृत्त दिलंय.
धीरेंद्र शास्त्री यांची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर सातत्यानं त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. ते कधी हिंदू राष्ट्र बनवण्याबाबत वक्तव्य करतात, तर कधी वेगवेगळे चमत्कार दाखवतात. आता मात्र ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण चमत्कारामुळे नव्हे, तर त्यांच्या भाऊ शालिग्राम याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने ही चर्चा सुरू झालीय.
हे ही वाचा : PHOTOS: ऑरेंज जॅकेट, काळा चष्मा अन्.. बर्फावर मस्ती, राहुल गांधींच्या ‘स्केटिंग’च्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ
शालिग्राम याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शालिग्राम हा हातात पिस्तुल आणि तोंडात सिगारेट घेऊन दलित समाजातील व्यक्तींशी वाद घालताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी एससी-एसटी कायद्यांतर्गत शालिग्राम याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. तर, दुसरीकडे या सर्व प्रकरणावर धीरेंद्र शास्त्री यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. या प्रकरणाचा त्यांच्याशी संबंध जोडू नये, असे त्यांनी स्पष्ट केलंय.
व्हिडिओमध्ये नेमकं काय?
आरोपी शालिग्राम तोंडात सिगारेट आणि हातात पिस्तुल घेऊन लोकांना धमकावत आणि शिवीगाळ करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसंच तो एका व्यक्तीला धरून मारहाण करण्याचा प्रयत्न करून येथे राय (बुंदेलखंडचे लोकनृत्य) चालणार नाही, असं म्हणताना दिसतोय. या गावात फक्त बागेश्वर धामचं गाणं वाजवलं जाईल, असंही तो म्हणतोय. दुसरीकडे, तेथे उपस्थित लोकांनी बागेश्वर धामचं गाणं वाजवण्यास नकार दिल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
’दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. याबाबत पोलीस अधीक्षक सचिन वर्मा म्हणाले की, ‘धार्मिक गाणी वाजवण्यावरून हा वाद झाला आणि पिस्तुल दाखवत धमकवण्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेची आता चौकशी करण्यात येत आहे. तपासानंतर आणखी काही गोष्टींचा खुलासा होईल.’
हे ही वाचा : Maha Political Crisis : सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचं पारडं जड, सरन्यायाधीश अखेर स्पष्टच बोलले
बागेश्वर महाराज म्हणाले…
लहान भावाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितलं की, ‘मी खोट्याची साथ देणार नाही. जो जे करेल, ते तो भरेल. ही बाब माझ्या निदर्शनास आली आहे. मी चुकीच्या कृत्याची साथ देणार नाही. पोलिसांनी निष्पक्षता आणि पारदर्शकता ठेवत या प्रकरणाचा तपास करावा. मी अजिबात चुकीच्या सोबत नाही, आणि प्रत्येक विषय माझ्याशी जोडला जाऊ नये. मी सनातन, हिंदुत्व आणि श्री बागेश्वर बाली यांच्या सेवेत अखंडपणे कार्यरत आहे.’
दरम्यान, या घटनेमुळे बागेश्वर महाराजांच्या भावाच्या अडचणीत वाढ झाली आहे. बागेश्वर धाम परिसरामध्येही या घटनेची जोरदार चर्चा आहे.