चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 14 फेब्रुवारी : नुकतेच ठाण्यात ठाकरे गटाच्या एका नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. ही घटना ताजी असताना आता पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी 25 वर्षे तरुणीने चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दयानंद इरकल यांच्यासह संध्या माने इरकल तसेच इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काल रात्री (13 जानेवारी) पावणे नऊच्या सुमारास घडली. काय आहे प्रकार? पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, पीडिता काल रात्री पुण्यातील एस बी रोड वरुन पूना हॉस्पिटलच्या दिशेने तिच्या दुचाकी वरुन प्रवास करत होती. यावेळी तिच्या पुढे असलेल्या चार चाकी (एमएच 12 डीडब्ल्यू 0001) वाहनाला तिने हॉर्न दिला. हॉर्न वाजवल्यामुळे पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष दयानंद इरकल यांना राग आला आणि ते गाडीतून खाली उतरले. त्यांनी त्या तरुणीचा विनयभंग केला तसेच गाडीत बसलेल्या संध्या माने इरकल यांनी त्या तरुणीच्या गालावर आणि गळ्यावर नखांनी बोचकरले तसेच हाताने आणि चपलेनी मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेल्या इतर 2 जणांनी देखील त्या तरुणीला मारहाण करत शिवीगाळ केली. 50 ते 60 जणांचा घोळका हातात कोयते आणि रॅाड घेवून घरात घूसून बलात्काराच्या धमक्या देत असल्याचंही तरुणीने सांगितले. पोलिसांनी या आरोपींना अटक केली असून आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने या आरोपींना 1 दिवस पोलीस कोठडी दिली आहे. वाचा - धक्कादायक! प्रियकर भाऊ असल्याचं भासवत पतीला दिलं विष, वाचा कसा झाला खुलासा ठाण्यात ठाकरे गटाचे नरेश मनेरा यांच्याविरोधात वियनभंगाचा गुन्हा घोडबंदर भागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी नरेश मनेरा यांच्यासह 10 ते 12 जणांविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश मनेरा हे माजी नगसेवक असून त्यांनी ठाण्याचे उपमहापौरपदही भूषवले होते. पीडित महिला घोडबंदर भागात राहते. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री त्या घरामध्ये असताना त्यांना कार्यक्रमातील ध्वनीक्षेपकाच्या आवाजाचा त्रास झाला. त्यामुळे त्या कार्यक्रम बंद करण्यासाठी नरेश मनेरा यांना भेटण्यासाठी गेल्या. त्यावेळी तेथील महिलांनी त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच नरेश मनेरा यांच्यासह 10 ते 12 महिला आणि पुरुषांनी गर्दीमध्ये त्यांचा विनयभंग केला. या प्रकारादरम्यान गळ्यातील सोनसाखळीही चोरीला गेल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणात कोणालाही अटक नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







