नामपल्ली, 20 डिसेंबर : लहान मुलांना अमानुषपणे मारहाण होत असल्याच्या अनेक घटना सतत आपल्या कानांवर पडत असतात. अनेकदा सोशल मीडियावर अशा घटनांचे व्हिडिओदेखील व्हायरल होतात. अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना तेलंगणात समोर आली आहे. तेलंगणातील एका दुकान मालकानं नऊ वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केली आहे. त्यानंतर आरोपीनं मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर लाल तिखटही टाकलं. लहान मुलाला तिखटामुळे आग होऊ लागल्यानं तो वेदनेनं ओरडू लागला. पण, दुकानदाराला त्या मुलाची अजिबात दया आली नाही. उलट त्यानं या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. संबंधित मुलाच्या कुटुंबीयांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी आरोपी दुकानदार कृष्णाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणाची पुढील कारवाई सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, तेलंगणातील नामपल्ली परिसरामध्ये ही घटना घडली आहे. पीडित मुलानं एका दुकानातून कोल्ड ड्रिंकची बाटली चोरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दुकानदार कृष्णानं या मुलाला चोरी करताना रंगेहाथ पकडलं. संतापलेल्या दुकानदारानं मुलाला बेदम मारहाण केली. त्यानं मुलाचे कपडे फाडले आणि हात-पाय दोरीने बांधले. त्यानंतर मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाल तिखट टाकलं. या घटनेचा व्हिडिओ तयार करून त्यानं स्वत:च व्हायरल केला. हेही वाचा : Kidnapping Case : बापाच्या समोर मुलीला उचलून नेलं, जबरदस्तीने कारमध्ये बसवलं अन्…धक्कादायक Video हैदराबादमध्येही अशीच घटना हैदराबादमधीलच सैफाबाद परिसरातही अशीच एक घटना घडली आहे. या घटनेत एका पित्यानं आपल्याच तीन वर्षांच्या मुलीला मारहाण करून तिची हत्या केली आहे. सकीना, असं या पीडित चिमुकलीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकीना बाथरूममध्ये गेली होती. अनेकदा आवाज देऊनही ती बाहेर येत नव्हती. हे पाहून तिचे वडिल बसिथ खान याला राग आला. त्यानं मुलीला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान मुलीची आई सना फातिमा यांनी सकीनाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बसित खाननं मुलीला जमिनीवर आपटलं. गंभीर जखमी झालेल्या सकीनाला उस्मानिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हेही वाचा : घरात रात्रभर दारूची पार्टी, पण सकाळी बायकोचं नवऱ्यासोबत भयानक कृत्य भारतात पालकांनी किंवा इतर व्यक्तींनी लहान मुलाला मारहाण करून जखमी केलं तर त्यांच्यावर कलम 323 नुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. याशिवाय, जर मुलांना धारदार शस्त्रानं मारहाण झाली तर कलम 324 लागू होतं. ज्यामध्ये तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. मुलांना गंभीर दुखापत केल्याबद्दल कलम 326 अन्वये गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. ज्यामध्ये 10 वर्षे किंवा जन्मठेपेपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. मारहाणीदरम्यान मुलाच्या डोक्याला दुखापत झाल्यास कलम 308 अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. हा गुन्हा सिद्ध झाल्यास तीन ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते.

)







