मुंबई, 24 डिसेंबर : मुंबईत म्हाडाचं घर मिळवण्यासाठी अनेक जण अर्ज दाखल करत असतात. या फ्लॅटच्या किमती तुलनेने कमी असतात, त्यामुळे बऱ्याच जणांचा म्हाडाची घरं घेण्याकडे कल असतो. प्रभादेवीच्या सेंच्युरी बाजार परिसरात म्हाडाचे फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 21 जणांची 2.30 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात ‘हिंदुस्थान टाइम्स’ने वृत्त दिलंय.
आरोपींची नावं सुनील घाटविसावे, त्याची पत्नी सुजाता, प्रशांत जाधव, बबिता भानगरे, रवी शिवगण आणि सरस्वती लोकरे अशी आहेत. पीडब्ल्यूडी विभागातील लिपिक दत्ताप्रसाद बाईत यांच्या तक्रारीच्या आधारे हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : विधानसभा अध्यक्षांनी नियमावर बोट ठेवलं; ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं, काय म्हणाले नार्वेकर?
“2017 मध्ये, घाटविसावे यानी तक्रारदाराला एमएचएडीएच्या कार्यालयात त्यांची चांगली ओळख आहे, असं सांगत सेंच्युरी बाजार भागातील म्हाडा कॉलनीत बाजारभावापेक्षा कमी किमतीत मिल वर्करचा फ्लॅट मिळवून देण्याचं आमिष दिलं होतं,” अशी माहिती दादार पोलीस स्टेशनचे सब-इन्स्पेक्टर एस साठे यांनी दिली.
घाटविसावेवर विश्वास ठेवत एप्रिल 2017 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत बाईतच्या नातेवाईकांसह इतर 20 लोकांनी 2.30 कोटी रुपये त्याला दिले आणि घरांसाठी करार केला. पण, आरोपी त्यांना फ्लॅट देऊ शकले नाहीत. फ्लॅटसाठी उशीर का होतोय, असं तक्रारदारांनी विचारलं असता आरोपी त्याकडे दुर्लक्ष करायचे आणि उडवाउडवीची उत्तरं देऊन वेळ मारून न्यायचे. अखेर जेव्हा घर खरेदीदारांना समजलं की त्यांची फसवणूक होत आहे, तेव्हा त्यांनी पोलिसांकडे संपर्क साधला आणि बुधवारी तक्रार दाखल केली.
“माझा आणि इतर खरेदीदारांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोपींनी आम्हाला प्रभादेवीला नेलं आणि तिथल्या सेंच्युरी बाजारातील फ्लॅट्स आम्हाला दाखवले. नंतर आरोपी आम्हाला म्हाडाच्या बांद्रा ईस्ट ऑफिसमध्येही घेऊन गेले. तिथं आमचे बायोमेट्रिक डिटेल्स गोळा केले. घाटविसावेच्या हेतूबद्दल शंका येईल, असं कोणतंही कारण आमच्याकडे नव्हतं,” असं बाईत म्हणाले.
फसवणूक झालेले सर्वजण प्रकल्पबाधित लोक आहेत आणि अलीकडेच त्यांना बिल्डरकडून प्रत्येकी 30 लाख रुपये मिळाले होते. त्यांनी या पैशांचा वापर म्हाडाचे फ्लॅट मिळविण्यासाठी केला होता, पण त्यांची फसवणूक झाली. “आरोपींनी रोख तसेच चेकद्वारे पैसे घेतले होते. त्या संदर्भातील पुरावे गोळा केले जात आहेत,” असं दादार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ इन्सपेक्टर महेश मुगुतराव यांनी सांगितले.
“सर्व पीडित गरीब आहेत. आमच्याकडे पैशाचे व्यवहार आणि झालेल्या कराराचे पुरावे आहेत. आम्ही पोलिसांकडे पुरावे सादर केले आहेत आणि या प्रकरणी वेगाने चौकशी होईल आणि न्याय मिळेल,” अशी आशा बाईत यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा : ‘ताज हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करा..’ 48 तासांत घर खाली करणारी नोटीस पाठवणाऱ्या MMRDA ला हायकोर्टाचा दणका
“घाटविसावे हा मुख्य आरोपी असल्याची शंका आम्हाला आहे, तर उर्वरित आरोपी ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते, ते लाभार्थी आहेत. आम्हाला 38 लाखांहून अधिक पैसे मिळाले आहेत आणि बाकी तपास सुरू आहे,” असं साठे म्हणाले. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 4०6, 409, 420 (फसवणूक) आणि 34 या अंतर्गत सहा आरोपींवर गुन्हे दाख केले आहेत.