धुळे, 02 एप्रिल: काल मध्यरात्री एका 43 वर्षीय व्यक्तीच्या हत्येनं धुळे शहर हादरलं आहे. धुळे शहरातील काँग्रेस भवनाजवळ विशाल गरुड नावाच्या एका 43 वर्षीय व्यक्तीचा निर्घृणपणे खून (Murder in Dhule) करण्यात आला आहे. या घटनेमुळं शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे पोलीस आरोपींचा शोध घेत असून पोलिसांच्या हाती अद्याप कोणताही सुगावा लागला नाही. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
धुळे शहरातील काँग्रेस भवनाजवळ काल मध्यरात्री विशाल नावाच्या व्यक्तीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आज सकाळ घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा जमला होता. यानंतर फोरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आलं होतं. या टीमकडून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. घटनास्थळाचा बारकाईने तपास केला जात आहे.
ही हत्या पूर्व वैमनस्यातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र या हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यात काही संशयास्पद दिसतयं का याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
हे ही वाचा - शांतताप्रिय न्यूझीलंडमधून धक्कादायक बातमी! भारतीय दाम्पत्याला ऑकलंडमध्ये भोसकलं
रात्री उशीरा झालेल्या या हत्येमुळे मृत विशाल गरूडच्या नातेवाईकांना धक्काच बसला आहे. जोपर्यंत आरोपींचा शोध घेतला जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृताच्या नातेवाईंकांनी घेतली होती. पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर मात्र नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. आरोपींचा तात्काळ शोध घेण्यात यावा अशी मागणी संबंधित नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. मात्र संबंधित हत्येबाबत पोलिसांना अद्याप कुठेलेही धागेदोरे हाती लागले नाहीत. विशाल गरुड यांचा खून कोणी आणि का केला? हे रहस्य कायम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Dhule, Murder