जळगाव, 30 नोव्हेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. हत्येच्या तसेच बलात्काराच्याही घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच आता शेतात गाय घुसल्याच्या कारणावरून काकाने आपल्या पुतण्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. जळगाव तालुक्यातील पाचोरा येथे घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
शेतात गाय घुसल्याच्या कारणावरून सख्खा काकाने आणि त्याच्या मुलाने पुतण्याचा खून केला. लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत त्यांनी त्याचा खून केला. ही घटना पाचोरा तालुक्यातील वाडी येथे मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. पूनमचंद भाऊराव पाटील (49, रा. वाडी ता. पाचोरा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पूनमचंद पाटील यांच्या मालकीची गाय त्यांच्याच शेतात चरत होती. चरताना ही गाय पुनमचंद यांचे काका प्रल्हाद मोतीराम पाटील (61) यांच्या शेतात घुसली. त्याचा राग येऊन प्रल्हाद आणि त्याचा मुलगा गणेश प्रल्हाद पाटील (45) या दोन्ही जणांनी पूनमचंदच्या मुलास मारहाण केली.
मुलास मारहाण झाल्याचे कळताच पूनमचंद शेतात आला. यानंतर काका-पुतण्यात वाद झाला. वादाचे रुपांतर मारहाणीत झाले आणि प्रल्हाद व गणेश या दोघांनी पूनमचंदला पत्नी आणि मुलासमोरच लाठ्या-काठ्यांनी जोरदार मारहाण केली. या मारहाणीत डोक्यात वार झाल्याने गंभीर जखमी झालेल्या जखमी पूनमचंद यांना शेजारील शेतकऱ्यांनी तत्काळ जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले.
हेही वाचा - प्रेयसीने गर्भवती असल्याचं सांगताच तरुणाला बसला धक्का, सेल्फी पाठवून घडलं भयंकर!
मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींना अटक करण्यास विलंब होत असल्याने गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. संतप्त नातेवाईकांनी आरोपींच्या घरावर दगडफेक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Jalgaon, Murder