पटना 22 मार्च : माणुसकीला काळिमा फासणारी एक भयंकर घटना समोर आली आहे. केवळ एक लहानसं रोपटं उपटल्यानं एका बारा वर्षीय मुलीवर रॉकेल ओतून तिला जाळण्यात (Man Burnt Minor Girl) आलं आहे. ही हृदय पिळवटणारी घटना बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यातील बरौनी ठाण्याच्या क्षेत्रात घडली आहे. या भयंकर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर मुलीला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, शिवरौना गावातील एक बारा वर्षांची मुलगी आपल्या घराबाहेर खेळत होती. याच दरम्यान तिनं आपल्या शेजाऱ्याच्या घरी लावण्यात आलेलं भाजीपाल्याचं रोपटं उपटलं. असा आरोप लावला गेला आहे, की याची माहिती मिळाल्यानंतर शेजारी असलेल्या सिकंदर आणि त्याच्या पत्नीनं मुलीला मारहाण केली. इतकं करुनही मन भरलं नाही, तेव्हा त्यांनी रॉकेल ओतून मुलीला पेटवून दिलं.
बरौनीचे एसओ सुरेंद्र सिंह यांनी सांगितलं, की आरोपी पती पत्नी विरोधात बरौनी पोलीस ठाण्यात शनिवारी एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. आगीत भयंकर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी सांगितलं, की पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासानंतरच या संपूर्ण घटनेबाबतचं सत्य समोर येईल. पोलीस आरोपींना अटक करण्यासाठी छापेमारी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही कुटुंबांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Fire