भोपाळ, 9 डिसेंबर: सरकारी दावे कितीही असले तरी दलितांवरील अत्याचार कमी झालेली नाही, असंच काही घटनांमधून समोर येत आहे. क्षुल्लक कारणांमुळे दलितांवर अन्याय केल्याच्या घटना सातत्याने उजेडात येत आहेत. आता तर फक्त जेवणाला हात लावला म्हणून एका दलित तरुणाची (Dalit Youth) हत्या केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.
मध्य प्रदेशमधील (MP) छत्तरपूर ((Chhatarpur) जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. देवराज अनुरागी असं या मृत तरुणाचे नाव असून तो छत्तरपूर चा रहिवाशी होता. देवराजने फक्त जेवणाला हात लावला म्हणून संतापलेल्या दोन तरुणांनी त्याला बेदम मारहाण केली, यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत.
काय घडला प्रकार?
मृत तरुण देवराजला छत्तरपूरमधील किशनपूर गावात होणाऱ्या एका पार्टीमध्ये साफ सफाईच्या कामासाठी बोलवण्यात आले होते. भूरा सोनी आणि संतोष पाल अशी या प्रकरणातील आरोपींची नावं असून या दोघांनीच देवराजला कामासाठी बोलावले होते.
(हे वाचा-4 महिन्यापूर्वीच झाले होते लग्न, चारित्र्यावर संशय घेऊन आवळला पत्नीचा गळा)
देवराज पार्टी संपल्यानंतर स्वत:साठी जेवण घेत होता. त्यावेळी सोनी आणि पाल यांनी त्याला प्रथम शिवीगाळ केली. त्यानंतर त्याला काठीनं बदडलं, या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार घडला तेंव्हा दोन्ही आरोपी दारुच्या नशेत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दोन्ही आरोपी फरार
सोनी आणि पाल हे दोन्ही आरोपी या प्रकरणानंतर फरार आहेत. त्यांच्यावर हत्या आणि एससी-एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा घडला ते मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून दूर असून उत्तर प्रदेशच्या सीमेवर आहे. दोन्ही आरोपींचा कसून शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत तरुण देवराज हा छत्तरपूरच्या एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा होता. त्याचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Dalit, Murder