रायबरेली, 28 फेब्रुवारी: धर्म आणि नाव लपवून एका युवतीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी मोहम्मद आरिफने आपलं नाव राजवीर सांगून सोशल मीडियावर एका युवतीशी मैत्री केली होती. त्यानंतर दोघांची मैत्री वाढत गेली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दरम्यान आरोपीने अनेक वेळा पीडित युवतीशी शारीरिक संबंध ठेवला. पण पीडित युवती गरोदर झाल्यानंतर आरोपीने लग्नास नकार देत, तिचाशी सर्व संबंध तोडले. याप्रकरणी पीडित मुलीने पोलिसांत तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकरण उजेडात आलं आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. संबंधित प्रकरण उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या घोसियानाजवळील टाऊन लालगंज येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी पीडित मुलगी फॅशन डिझाइनचा कोर्स करत होती. यादरम्यान सोशल मीडियावर तिची ओळख राजवीर केसरीया नावाच्या एका युवकासोबत झाली. राजवीरने लखनऊचा रहिवाशी असल्याचं सांगितलं. शिवाय MBA केल्यानंतर मुंबईत राहून मॅनेजमेंटचा कोर्स करत असल्याची बनावट माहिती पीडित मुलीला दिली.
त्यानंतर राजवीर उर्फ मोहम्मद आरिफ पीडित युवतीला अनेकदा भेटायलाही आला. यावेळी त्याने पीडित मुलीला लग्न करण्याचं वचनही दिलं. शिवाय कुटुंबीयांना आपल्या संबंधाबाबत माहित असून त्यांनी लग्नाला होकार दिल्याची खोटी माहितीही आरोपीने पीडितेला दिली. यानंतर त्याने अनेकवेळा पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. पण पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर आरोपीने तिच्याशी बोलणं थाबवलं. तिला शिवीगाळ करायलाही सुरुवात केली.
(वाचा- संतापजनक!चारित्र्याच्या संशयावरुन रस्त्यात पत्नीची हत्या,लोक व्हिडीओ बनवत राहिले)
यानंतर राजवीरचा बदललेला स्वभाव पाहून पीडितेनं आरोपीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्याकडून मिळालेली माहिती ऐकून तिला धक्काच बसला आहे. राजवीरचं खरं नाव मोहम्मद आरिफ असून तो रायबरेली येथील रहिवाशी असल्याचं समजलं. या प्रकरणानंतर पीडितेनं नवाबगंज पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विविध कलमांतर्गत आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.