पुणे, 14 सप्टेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे काही जण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत असल्याचेही समोर आले आहे. पुण्यातून यासंबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याने एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा निर्णय घेतला आणि गळफास घेत आपले जीवन संपवले.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
हिश्याची जमीन विकून त्याचा मोबदला दिला नाही. तसेच खोट्या तक्रारी करण्यात आल्या. या त्रासाला कंटाळून एका 40 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केली. महादेव मधुकर कोद्रे (वय 40, रा. माळीनगर, बिजवडी पवार वस्ती, ता. माळसिरस, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवले. याप्रकरणी प्रमिला महादेव कोद्रे (वय 40) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन वसंत अनंत कोद्रे (रा. हडपसर) व संभाजी जगन्नाथ कणसे (रा. धनकवडी) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गोड बोलून जमीन विकायला लावली -
फिर्यादी प्रमिला कोद्रे यांचे वसंत कोद्रे हे भावकीमध्ये दीर आहेत. वसंत आणि त्याचा मित्र संभाजी कणसे यांनी संगनमत केले आणि गोड बोलून महादेव कोद्रे यांच्या हिश्यावर आलेली मुंढवा येथील जमीन विकली. त्याचा मोबदला म्हणून 99 लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, हा धनादेश खात्यात पैसे नसल्याने परत आला. याबाबत महादेव कोद्रे यांनी विचारणा करूनही पैसे आले नाहीत. त्यामुळे त्यांनी कोर्टात केस टाकतो, असे सांगितले. असे सांगितल्यावर दोन्ही आरोपींना राग आल्याने दोघांनी महादेव कोद्रे यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी केल्या.
हेही वाचा - घरात सलग दुसऱ्यांदा मुलीचा जन्म झाल्याने आजोबा नाराज, दारू पिऊन घेतला टोकाचा निर्णय
यानंतर आरोपींच्या या त्रासाला महादेव कोद्रे कंटाळून होते. त्यामुळे ते पुण्यात येऊन विश्रांतवाडी येथील भागीरथी सोसायटीत भाड्याने जागा घेऊन राहू लागले होते. मात्र, तरीही त्यांचा त्रास कमी न झाल्याने अखेर त्यांनी या त्रासाला कंटाळून 11 तारखेला दुपारी गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money fraud, Pune