चूरू, 14 सप्टेंबर : एकीकडे देशात बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान सुरू करण्यात आले. मात्र, तरीसुद्धा आज काही ठिकाणी मुलगा आणि मुलीमध्ये भेद मानला जातो. काही लोक आजही मुलींचा जन्म झाल्यानंतर आनंदी नसतात. याबाबतचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात मुलीचा जन्म झाला म्हणून वृद्ध व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलत धक्कदायक निर्णय घेतला.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
राजस्थानमध्ये 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा नारा देऊनही आजही मुलगा-मुलगी हा भेद कमी झालेला नाही. राजस्थानसह देशभरात मुलींच्या शिक्षणासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू असताना काही लोक मुलींच्या जन्मावर खूश नाहीत. त्याची प्रचिती नुकतीच राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात पाहायला मिळाली. येथे एका वृद्ध व्यक्तीने विष पिऊन आत्महत्या केली. या वृद्धाच्या घरी सलग दुसऱ्यांदा नात जन्माला आली. यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर कुटुंबात शोककळा पसरली आहे. तर याप्रकरणी पोलीस कारवाई करण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे.
ही घटना घणाऊ गावातील आहे. येथील रहिवासी रामकुमार बाजीगर असे मृताचे नाव आहे. त्यांचे वय 50 वर्ष होते. त्यांनी मंगळवारी शेतात जाऊन विष घेऊन आत्महत्या केली. रामकुमारचा मुलगा रणवीर याने सांगितले की, त्याचा भाऊ मुकेशचे लग्न 2019मध्ये झाले होते. लग्नानंतर त्यांना पहिली मुलगी झाली. यामुळे त्याचे वडील दु:खी होते. यानंतर मुकेशची पत्नी दुसऱ्यांदा गरोदर राहिली तेव्हा रामकुमार यांनी नातवाची आशा ठेवली होती.
हेही वाचा - हुंड्यावरून सतत व्हायचा वाद; पत्नीला कळू न देता पतीने तिची किडनीच विकली, 4 वर्षांनी खुलासा
मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास तिची प्रसूती झाली. पण दुसऱ्यांदाही तिला मुलगी झाली. ही बाब रामकुमार यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी रागाच्या भरात भरपूर प्रमाणात दारू प्यायले. यानंतर शेतात जाऊन विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी रामकुमार यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. तर परिसरात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.