पिंपरी, 03 मे: कोरोना विषाणूच्या साथीनं (Corona pandemic) सध्या देशात हाहाकार माजवला आहे. मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या (Corona cases in India) झपाट्यानं वाढत आहे. अशात पुण्यातील एका सरकारी रुग्णालयाचा गलिच्छ कारभार चव्हाट्यावर आला आहे. येथील काही डॉक्टरांनी रुग्णाला उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांकडून तब्बल 1 लाख रुपये आकारले आहेत. विशेष म्हणजे संबंधित रुग्णालय महापालिकेच्या अखत्यारीत आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन डॉक्टरांना अटक केली आहे. संबंधित घटना पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील असून येथील ऑटो क्लस्टर रुग्णालयात ही संतापजनक घटना घडली आहे. कोविडविरुद्धच्या लढ्यात मोलाचं योगदान दिल्यामुळे देशभरात डॉक्टरांना कोरोना योद्धा म्हणून सन्मान मिळत आहे. अशात हे रक्षकच भक्षक बनण्याच्या घटना समोर येत आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांकडून एक रुपयाही आकारला जात नाही. अशात ऑटो क्लस्टर रुग्णालयातील 3 डॉक्टरांनी रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी आणि दाखल करून घेण्यासाठी तब्बल एक लाख रुपये उकळले आहेत. याप्रकरणी महापालिकेनं पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून संबंधित तीन डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे. स्पर्श प्रायव्हेड लिमिटेडचे डॉ. प्रवीण जाधव, वाल्हेकरवाडी येथील पद्मजा रुग्णालयाचे डॉ. शशांक राळे आणि डॉ. सचिन कसबे अशी अटक केलेल्या डॉक्टरांची नावं आहे. याबाबतची फिर्याद पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास बबनराव जगताप यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दिली आहे. हे ही वाचा- मरणही परवडेना! स्मशानात जाण्यासाठी उकळले बक्कळ पैसे; रुग्णवाहिका चालकाला अटक दैनिक लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, 23 एप्रिल रोजी सुरेखा अशोक वाबळे नामक कोविड रुग्णाला ऑटो क्लस्टर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणलं होतं. या रुग्णालयात रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही. असं असताना आरोपींनी सुरेखा यांच्या नातेवाईकांना वेठीस धरून त्यांच्याकडून 1 लाख रुपये उकळले आहेत. रुग्णाला अॅडमीट करण्यासाठी आणि बेड मिळवून देण्यासाठी पैसे लागतात, असं सांगून आरोपींनी त्यांची फसवणूक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







