पिंपरी, 25 फेब्रुवारी: पुण्यानजीक (Pune) असणाऱ्या पिंपरी (Pimpri) परिसरात एका तरुणानं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या (Son in law commit suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासू, बायको, मेहुणा, मेहुणी आणि साडू यांच्या त्रासाला कंटाळून संबंधित तरुणानं आपल्या राहत्या घरात गळफास घेतला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये (Suicide note) त्यानं मृत्यूचं कारण लिहिलं असून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींची नावं लिहिली आहेत. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. गणेश नागनाथ चव्हाण असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. गणेशचे वडील नागनाथ भाऊराव चव्हाण यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी मृताची पत्नी रोशनी गणेश चव्हाण (वय 24), वनिता मोहन पवार (वय 45, नांदेड), रुपाली आलोक राठोड (वय 20, रा. मुंबई), आलोक दशरथ राठोड (वय 28, रा. मुंबई), रितेश मोहन पवार (वय 19, रा. नांदेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा- तिने प्रेमाला नकार दिला अन् माथेफिरूने तरुणीच्या डोक्यात हातोडीने केले सपासप वार मिळालेल्या माहितीनुसार, मृत गणेश आणि आरोपी पत्नी रोशनी यांचा विवाह 2013 साली झाला होता. गणेश हा पुण्यातील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह तो सुतारवस्ती, माण आणि हिंजवडी परिसरात वास्तव्याला होता. दरम्यान रोशनीची आई वनिता पवार हिने गणेशकडून 1 लाख 30 हजार रुपये उसने घेतले होते. पण गेल्या बऱ्याच काळापासून ती पैसे परत देत नव्हती. वारंवार मागणी केल्यानंतरही आरोपी सासू पैसे परत करण्यास टाळाटाळ करत होती. पैशांच्या कारणातून वाद झाल्यानंतर आरोपी सासूने आपली मुलगी रोशनीला गणेश विरोधात भडकावलं. यामुळे गणेश आणि रोशनी यांच्यात वाद झाला. हेही वाचा- आजोबांची हत्या करून घरातच पुरला मृतदेह; 45 दिवस कोणालाच नव्हता थांगपत्ता या वादानंतर पत्नी रोशनी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन मुंबईला आपल्या बहिणीकडे गेली. यानंतर तिने आपल्या मुलांना गणेशपासून लपवून ठेवलं. तसेच मुलांना भेटण्यास मज्जाव करत मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. यामध्ये रोशनीची बहिण रुपाली आणि तिचा नवरा आलोकही तिला मदत करत होता. अखेर आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून गणेशनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हेही वाचा- ‘मला माफ करा..,’ म्हणत आवळला गळा, बापलेकांच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा तत्पूर्वी त्याने आपला भाऊ दिनेशला फोन केला. मी खूप त्रासलो आहे. मला त्रास सहन होत नाही. तुझ्याशी माझं शेवटचं बोलणं आहे, असं म्हटलं. भावाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं कळताच दिनेशनं त्याच्या एका मित्राला गणेशच्या घरी पाठवलं. मित्र गणेशच्या घरी गेला. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. गणेशनं राहत्या घरात गळफास घेतला होता. गणेशनं आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये पत्नी, सासू, मेहुणा, मेहुणी आणि साडूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.