लखनौ, 13 फेब्रुवारी : इंटरनेटवरील पॉर्न (Porn) साईट्स पाहून वाढणारी विकृती हा एक काळजीचा विषय आहे. पॉर्न साईट्समुळे वाढणारी विकृती आणि गुन्हेगारी लक्षात घेऊन सरकारनं बहुतांश साईटवर बंदी घातली आहे. मात्र तरीही या साईट्स वेगवेगळ्या माध्यमातून पाहण्याचं प्रमाण कमी झालेलं नाही. पॉर्नच्या दुनियेची चटक लागलेल्या या मंडळींना वेळीच सावध करण्यासाठी आता कठोर पावलं उचलण्यात येणार आहेत.
उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) 1090 नावाची एक विशेष टीम तयार केली आहे. या क्रमांकावरील टीम इंटरनेटवरील अश्लिलतेवर नजर ठेवणार आहे. या प्रकारच्या साईट्स पाहणाऱ्या व्यक्तीला सावधगिरीचा इशारा पहिल्यांदा दिला जाईल. तसंच भविष्यात त्या भागात छेडछाड किंवा अन्य गैरकृत्य झाले तर या डेटाचा आरोपीला पकडण्यासाठी उपयोग होणार आहे.
( वाचा : प्रेमभंगातून गावठी कट्ट्याने स्वत:वरच झाडली गोळी, Valentine's Day च्या काही तास आधी संपवलं आयुष्य )
उत्तर प्रदेश एडीजी नीरा रावत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. इंटरनेटचा वापर वाढत चालल्यानं लोकांपर्यंत पोहचण्यासाठी 1090 टीमचा उपयोग केला जाणार आहे. इंटरनेट एनलिटिक्सचा अभ्यास करण्यासाठी oomuphh नावाची एक कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. ही कंपनी इंटरनेटवर काय सर्च केले जात आहे, यावर लक्ष ठेवेल. एखादी व्यक्ती इंटरनेटवर पॉर्न साईट्स पाहत असेल तर त्याची तात्काळ माहिती या टीमला मिळणार आहे. सध्या उत्तर प्रदेशातील सहा जिल्ह्यात ही योजना राबवली जात असून याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं रावत यांनी सांगितले.
(वाचा - इंटरनेट वापरात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर; रिपोर्टमधून महत्त्वाची बाब समोर)
11.6 कोटी इंटरनेट युझर्स
‘’उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरु केली जाणार आहे. राज्यात जवळपास 11.6 कोटी इंटरनेट युझर्स आहेत. या सर्वांवर या टीमच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महिला सुरक्षा संकल्पाला यामुळे मदत मिळणार आहे. महिलांवरील गुन्हे करणाऱ्या आरोपींच्या भोवती यामधून चक्रव्यूह तयार केला जाणार आहे,’’ असे रावत यांनी स्पष्ट केले.