औरंगाबाद, 12 मे: कौटुंबीक वादातून पतीनं आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या (Husband killed wife) केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील कायगाव याठिकाणी घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीनं स्वतः ही गळफास घेऊन आत्महत्या (Husband commits suicide) केली आहे. वंदना आणि ज्ञानेश्वर विठ्ठल भोकरे असं मृत दाम्पत्याची नावं आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तर शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत वंदना आणि ज्ञानेश्वर यांच्यात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतं असायची. मृत ज्ञानेश्वरचा स्वभाव रागीट असल्यानं तो किरकोळ कारणांवरून अनेकदा आपल्या पत्नीला मारहाण करायचा. अशातचं पत्नीला 3 मुली झाल्यामुळं मृत ज्ञानेश्वरला पत्नी वंदनावर प्रचंड राग होता. याच कारणावरून दोघांत अनेकदा खटके उडाले होते. पण अलीकडेचं तीन वर्षांपूर्वी मृत दाम्पत्याला एक मुलगाही झाला होता. तरीही पहिल्यांदा तीन मुली झाल्याचा राग त्याच्या मनातून कमी झालेला नव्हता.
हे वाचा-होणाऱ्या नवऱ्याला मारण्यासाठी शीतपेयातून दिलं विष; यवतमाळमधील वधूचा प्रताप
10 मे रोजी रात्री घरातील सर्वजण झोपी गेले असता, मृत ज्ञानेश्वरनं वंदनाची गळा आवळून हत्या केली. आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यानंतर आरोपी पती ज्ञानेश्वर कायगावातील उपसरपंच विश्वास दाभाडे यांच्या घरी मदत मागण्यासाठी गेला. दिव्य मराठीने याबाबत वृत्त दिलं आहे. मीडिया अहवालानुसार, ज्ञानेश्वरनं घडलेला सर्व प्रकार उपसरपंच दाभाडे यांना सांगितला आणि मदत करण्याची विनंती केली. यावेळी दाभाडे यांनी 'मी फ्रेश होऊन येतो, त्यानंतर आपण काहीतरी करू' असं सांगून घरात निघून गेले.
हे वाचा-मित्रच निघाला वैरी! जुन्या वादातून तरुणाची हत्या; नांदेडमधील मन हेलावणारी घटना
बराच वेळ होऊनही दाभाडे घराबाहेर आले नाहीत, त्यामुळे घाबरलेल्या ज्ञानेश्वरनं आपल्या मळ्यात जाऊन तेथील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी 11 वाजता आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव या करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Crime news, Murder, Wife and husband