पुणे, 21 सप्टेंबर : पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्य घटना घडताना दिसत आहे. यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरगुती वादातून पत्नीचा खून केल्यावर पतीनेही गळफास घेत आत्महत्या केली. शहरातील गंधर्वनगरी, मोशी येथे ही घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - शांताबाई शिवराय ऐळवे (वय 52) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर शिवराय तुकाराम ऐळवे (वय 60, रा. गंधर्वनगरी, मोशी) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. शिवराय हे सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करीत होते. तर शिवराय आणि त्यांची पत्नी शांताबाई या दोघांमध्ये नेहमी घरगुती कारणांवरून वाद होत असत. दरम्यान, बुधवारी सकाळी त्यांचा मुलगा कामानिमित्त बाहेर गेला होता. यादरम्यान, शिवराय आणि त्यांची पत्नी शांताबाई यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादाने नंतर टोकाचे रुप धारण केले आणि शिवराय याने रागाच्या भरात शांताबाई यांचा खून केला. इतकेच नव्हे तर त्यानंतर शिवराय याने गळफास घेऊन आत्महत्याही केली. शांताबाई यांचा गळा दोरीने आवळून डोक्यात पाटा घातला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
असा आला प्रकार समोर - शिवराय यांची मुलगी आईवडिलांना भेटण्यासाठी आली होती. मात्र, यावेळी घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे त्यांच्या मुलीने तिच्या भावाला फोन केला. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास शिवराय यांचा मुलगा घरी आला. त्यावेळी घर आतून बंद होते. मुलाने बराच वेळ दरवाजा ठोठावला. मात्र, त्याला आतून काहीही प्रतिसाद आला नाही. हेही वाचा - लोन अॅपद्वारे घेतलेल्या कर्जाने घेतला जीव, पुण्यातील तरुणासोबत घडला भयानक प्रकार म्हणून त्याने दरवाजा तोडला आणि आत पाहिले तर शिवराय आणि शांताबाई या दोघांचा मृतदेह घरात पडला होता. या घटनेनंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. तर एमआयडीसी भोसरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.