तिरुअनंतपुरम 15 जुलै : ‘काखेत कळसा अन् गावाला वळसा’ अशी मराठीमध्ये म्हण आहे. एखादी वस्तू डोळ्यांसमोर असते पण आपण ती इतरत्र शोधतो, असा या म्हणीचा अर्थ. केरळमधील पथनमथिट्टा जिल्ह्यातील पोलिसांबाबत असंच काहीस घडलं आहे. ते 17 वर्षांपासून ज्या गुन्हेगाराचा शोध घेत होते तो त्यांच्यासमोरच होता. 26 मे 2006 रोजी घडलेल्या एका खून प्रकरणात पोलिसांनी जनार्दनन नायर (75 वर्षे) याला अटक केली आहे. विशेष म्हणजे खून झालेली व्यक्ती ही जनार्दननची पत्नी होती आणि या खुनाचा तपास लागावा यासाठी त्यानं स्वत: न्यायालयाच्या मदतीनं हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे देण्यासाठी प्रयत्न केले होते. ‘इंडियन एक्सप्रेस’नं याबाबत वृत्त दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पथनमथिट्टा जिल्ह्यातील पुल्लाड गावात राहत्या घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात रमादेवी (वय 50 वर्षे) यांचा मृतदेह सापडला होता. रमादेवींच्या शेजारी राहण्यासाठी आलेल्या तमिळनाडूमधील एका स्थलांतरित मजुरानं हा खून केल्याचा संशय होता. कारण, घटना घडल्यानंतर तो लगेच बेपत्ता झाला होता. Viral News: 25 वर्षीय तरुणाने खाल्ले 150 मोमोज; काहीच वेळात चक्कर येऊन पडला अन् पुन्हा उठलाच नाही फॉरेन्सिक पुराव्याची पोलिसांनी नव्यानं तपासणी केल्यानंतर खरा आरोपी जनार्दनन असल्याचं उघड झालं. तपास अधिकारी आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील राज यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनार्दननला पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशय होता त्यामुळे त्यानं हा खून केला होता. 26 मे 2006 रोजी रात्री रमादेवींचा खून झाला होता. जनार्दनन त्यावेळी अलाप्पुझा जिल्ह्यातील चेंगन्नूर येथे पोस्टात वरिष्ठ लेखापाल होता. त्यानं पोलिसांना सांगितलं होतं की, घरात रक्ताच्या थारोळ्यात रमादेवींचा मृतदेह आढळला होता. रमादेवींनी घातलेले दागिने नाहीसे झालेले होते. प्राथमिक तपासादरम्यान, शेजारच्या एका महिलेच्या जबाबानुसार पोलिसांनी स्थलांतरित मजुराला संशियत आरोपी मानलं. कोइपुरम पंचायतीचे तत्कालीन सदस्य पी. उन्नीकृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रमादेवीला न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी एक कृती समिती स्थापन केली होती. पोलीस तपासाला गती देण्यासाठी या समितीनं तत्कालीन मुख्यमंत्र्यांना निवेदनं दिली होती. पोलिसांच्या कथित निष्क्रियतेच्याविरोधात जनार्दनननं 2007 मध्ये केरळ उच्च न्यायालयात जाऊन या प्रकरणाचा तपास केरळ पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्याची विनंती केली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये या प्रकरणाचा तपास हाती घेतलेले इन्स्पेक्टर सुनील राज यांच्या म्हणण्यानुसार, आपल्यावर संशय येऊ नये यासाठी जनार्दनननं हे पाऊल उचललं होतं. क्राईम ब्रँचने संशयित मजुराच्या पत्नीचा तपास लावला. मात्र, तिच्याकडून मजुराबद्दल माहिती मिळाली नाही. शेवटी पोलिसांनी रमादेवींच्या मुठीत सापडलेल्या केसांचे फॉरेन्सिक अहवाल पुन्हा तपासले. हत्येच्या चार वर्षांनंतर पोलिसांना फॉरेन्सिक अहवाल मिळाला होता. मात्र, मुख्य संशयित सापडत नसल्यानं त्यांनी कोणत्याही संशयिताशी ते जुळवण्याचा प्रयत्न केला नव्हता. दिलेल्या जबाबात विसंगती आढळून आल्यानं क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना जनार्दननवर संशय येऊ लागला. त्यांनी रमादेवींच्या मुठीत सापडलेले केस आणि जनार्दनचे केस तपासून बघितले असता एकमेकांशी मॅच झाले. त्यानंतर पोलिसांनी जनार्दननच्या तत्कालीन घराच्या दरवाजाचं रिक्रिएशन करून त्याच्या जबाबाची पडताळणी केली. तेव्हा तो खोटं बोलत असल्याचं निदर्शनास आलं. सर्व पुरावे विरोधात गेल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.