अमित राय, प्रतिनिधी मुंबई, 24 सप्टेंबर : मुंबईच्या लाईफलाईन लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या सर्व महिलांसाठी ही सर्वात महत्वाची बातमी आहे. सध्या एक वेडा अर्धनग्न अवस्थेत फिरतोय आणि संधी बघून तो महिलांची छेड काढत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई रेल्वे पोलीस या अर्धनग्न व्यक्तीचा शोध घेत आहेत. अर्धनग्न अवस्थेत तो मुंबईच्या सर्व लोकल स्टेशनवर बेधडकपणे फिरतो आणि जिथे त्याला संधी मिळेल तिथे प्रवास करणाऱ्या महिलांसोबत अश्लील कृत्य करून तो पळून जातो. नुकताच घडला धक्कादायक प्रकार - नुकत्याच या नराधमाने मुंबईतील जोगेश्वरी स्थानकात व्यवसायाने वकील असलेल्या तरुणीला एक धक्कादायक अनुभव आला. लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात या तरुणीसोबत या नराधमाने अश्लिल कृत्य केले आणि नंतर तिथून पोबारा केला. यानंतर या तरुणीने रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. सुरुवातीला या तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला. मात्र, यानंतर ती जेव्हा तक्रार करण्यासाठी रेल्वे पोलीस चौकीत पोहोचली तेव्हा हेच पोलिसांनी तिला तिच्या क्षेत्राची माहिती देण्यास सुरुवात केली. यानंतर जवळपास तीन तासांनी ट्विटरच्या माध्यमातून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तिने आपले म्हणणे पोहोचवले. त्यानंतर तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. महिलांसाठी लोकल हा सर्वात सुरक्षित प्रवास असल्याचा दावा रेल्वे पोलीस नेहमीच करत असले तरी आता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करण्यासाठी 3 पथके तयार केली आहेत. ही पथके आरोपींच्या शोधात आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांनी अंधेरी स्थानक आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्याचा चेहरा ओळखला आहे. तसेच आरोपींबाबत काही सुगावा लागल्यास त्यांनी त्वरित पोलिसांना कळवावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
सावधान, लोकलमध्ये फिरतोय अर्धनग्न नराधम, जोगेश्वरीत तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार pic.twitter.com/4ZKoA03Ro4
— News18Lokmat (@News18lokmat) September 24, 2022
हेही वाचा - चोर नग्न अवस्थेत अंगाला तेल लावून रस्त्यावर फिरायचा, मुंबई पोलिसांनी ठेचल्या नांग्या तर दुसरीकडे, रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पोलिसांकडून पीडित महिलेशी केलेल्या गैरवर्तनाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. यासाठी एक पथकही तयार करण्यात आले असून, ते आपला तपास अहवाल रेल्वे आयुक्तांना सादर करणार असून, त्या अहवालाच्या आधारे दोषी पोलिसांवरही कारवाई करण्यात येणार आहे.